सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग १)

डिजिटल पुणे    28-04-2025 10:36:54

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग १)
 
जे पिंडी तेचि ब्रह्मांडी | ऐसी बोलावयाची प्रौढी | हे वचन घडीने घडी | तत्वज्ञ बोलती ||९/५/२||
 
तत्त्वज्ञानी लोक जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे बोलत असतात जणू असे बोलण्याचा प्रघात पडला आहे.
 
शिष्य म्हणतात की असे बोलणे काही मनाला पटत नाही. हे बघायला जावे तर नुसताच गोंधळ उडतो. शास्त्रात वर्णन केलेली पिंड ब्रह्मांडाची रचना व त्यांचा व्यवहार दोन्ही प्रत्यक्षात कसोटीला उतरत नाही. हे सांगण्यासाठी पुढील वर्णन समर्थ करतात. पिंडाचे चार देह (स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण), ब्रह्मांडाचे चार देह (विराट, हिरण्य, अव्याकृत, व मूळप्रकृती) यांचा अनुभव प्रत्यक्ष कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. हे वर्णन काल्पनिक वाटते. कसे ते पहा – पिंडात जसे अंत:करण तसे ब्रह्मांडाचे अंत:करण विष्णू आहे. पिंडात जसे मन आहे तसे ब्रह्मांडात चंद्र आहे. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव आहे. पिंडात जसे चित्त तसे ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडात जसा अहंकार तसा ब्रह्मांडात रुद्र आहे.
 
यावर शंका येते की विष्णूचे अंत:करण कोणते ? चंद्राचे मन कसे आहे ? ब्रह्मदेवाच्या बुद्धीचे लक्षण काय आहे ? नारायणाचे चित्त कसे असते ? रुद्राचा अहंकार कसा आहे ? याची उत्तरे सद्गुरूंनी द्यावी. सिंहासमोर जसे कुत्र्याची किमंत काहीच नसते तसे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या निश्चयात्मक ज्ञानापुढे अनुमानाची किंमत नगण्य असते. खऱ्यासमोर खोटे प्रमाण कसे होईल ? समर्थ अनुभवाला महत्व देतात. प्रचीतीचे ध्यानात येण्यास खरा पारखी पाहिजे. नीट परीक्षा केली म्हणजे खरे काय आहे याचा निश्चय करता येतो. अन्यथा संशयजाळात माणूस अडकून बसतो.
 
हा विषय समजून सांगताना एक तर जे अनुभवाला आले आहे ते शास्त्रात असले पाहिजे किंवा जे शास्त्रात लिहिले आहे त्याचा अनुभव आलेला पाहिजे. कुत्रे ओरडलेले ऐकवत नाही तसे नुसते कोरडे शब्दज्ञान उपयोगाचे नाही. आंधळ्या माणसाच्या समुहात एका डोळस माणसाचे कोणी ऐकत नाही तसे स्वानुभवाचे डोळे नाहीत तेथे स्वरूपाबद्दल सगळा अंधार आढळून येतो. देहबुद्धी असलेली माणसे स्वरूपाबाबत आंधळीच असतात. त्यांना स्वरूप वर्णन समजणे, पटणे अवघडच असते.
 
देहबुद्धी असलेली माणसे डोंबकावळ्या सारखी असतात ते दृश्याची घाण चिवडत बसतात. दुध पाणी मिश्रणाऐवजी घाण मिळून त्याचा गोळा करून समोर ठेवला तर त्यात योग्य निवड करण्यासाठी राजहंसाची गरज नाही. त्यासाठी डोंबकावळे कुशल असतात. पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची रचना आहे अशी कल्पना करून तसे लोक नुसते बोलून दाखवतात त्याचा पुरावा कोणी देत नाही. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी हा सगळा अनुमानाचा खेळ आहे. चांगल्याने त्यात शिरू नये. चोरांनी त्यात संचार करावा. आपण ज्या देवांना मानतो तेही काल्पनिक आहेत. त्यांचे अस्तित्व मानले तर कोणते प्रश्न निर्माण होतात ते पुढील लेखात बघू.
 
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 Give Feedback



 जाहिराती