सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

अक्षय तृतीयेचा मुहूर्त; बालविवाह विरोधी पथके सतर्क! आपल्या जवळपास होणाऱ्या बालविवाहांची माहिती कळविण्याचे प्रशासनाचे आवाहन!

डिजिटल पुणे    29-04-2025 11:48:03

छत्रपती संभाजीनगर- अक्षय तृतीया हा सण बुधवार दि.३० रोजी आहे. या मुहूर्तावर अनेक विवाह होत असतात. त्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाने बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात बालविवाह रोखण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दि.१ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत एकूण ८८ बालविवाह  या कृती दलामार्फत थांबविण्यात आले आहेत. चार प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी विविध जाणीव जागृतीपर उपक्रम घेऊन जनसामान्यांमध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याची जाणीवजागृती व्हावी व बाल वयात बाल हक्कांपासून बालके वंचित राहू नयेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे. 

दरम्यान या महिन्यात बुधवार दि.३० रोजी  असणाऱ्या अक्षय तृतीया या सणाच्या शुभ मुहूर्तावर अनेक बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे बालविवाह रोखण्याकरिता जिल्ह्यातील तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. 

 बालविवाह प्रतिबंध अधिनियम२००६ या कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्षाच्या आत असतांना  विवाह केला तर असा विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. असा विवाह केल्यास आयोजकांना अधिनियमानुसार एक लाख रुपये आर्थिक दंड व दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद किंवा दोन्ही शिक्षेचे प्रावधान आहे. तसेच ६ जून २०१३ (सुधारित २१.१०.२०२२) च्या शासन आधिसुचनेनुसार ग्रामपंचायतसाठी ग्रामसेवक व १८ ऑगस्ट २०१६ (सुधारित २१.१०.२०२२) च्या अधिसुचनेनुसार नागरी भागाकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित केले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील तर नागरिकांनी अशी माहिती चाइल्ड हेल्प लाइन १०९८ तसेच ११२ या  मोफत हेल्प लाईन नंबरवर फोन करून द्यावी.माहिती    देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. आपल्या नजिक होत असलेल्या बालविवाहाची  माहिती नजीकचे पोलिस स्टेशन/ग्रामपंचायत कार्यालय/पंचायत समिती/बाल कल्याण समिती/जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे देखील तात्काळ संपर्क साधून द्यावी,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.  


 Give Feedback



 जाहिराती