मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु वर्षा बंगल्यावरच राहत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सागर बंगाल्यावरच राहत होते. अशातच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत आज (30 एप्रिल) वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्षा यांच्या बंगल्यातील हाऊसवॉर्मिंगचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
“सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा…
आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला.
आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली. कारण, माझ्या मुलीची 10 वीची परीक्षा असल्याने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. माझी परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाऊया, असे दिविजा हिने तिचे वडिल देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते. त्यामुळे, लेकीच्या परीक्षेचा विचार करुनच मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर लगेचच जाणे टाळले होते. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी माहिती देखील दिली होती.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं स्पष्टीकरण
“एकनाथ शिंदेनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथं जायचं आहे, तिथं बंगल्यावर काही छोटी-मोठी कामंही होणार आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी 10 वी मध्ये शिकत आहे, ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिथं शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथं लगेच शिफ्ट झालो नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, इतक्या वेड्यासारख्या चर्चा, माझ्या स्तराच्या माणसाने अशा प्रश्नावर उत्तरही देऊ नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.