सांगली : महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यासाठी सांगली जिल्ह्याचेही योगदान राहील, यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.महाराष्ट्र दिनाच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. पोलीस परेड ग्राउंड, विश्रामबाग येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, गत वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली. चालू आर्थिक वर्षात 545 कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महसूल विभागाकडून तहसीलस्तरावर सातबारा पुस्तके, फेरफार पुस्तके व हक्क नोंद संचिका संकलनाची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये 5 हजार 435 सात-बाराची पुस्तके, 2 हजार 268 फेरफार पुस्तके व तीन लाख 22 हजार 785 हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा करण्यात आल्या. यामुळे जुने फेरफार व सात-बाराच्या नक्कल तहसिल कार्यालयात विनासायास मिळणे सुकर झाले आहे, असे ते म्हणाले.
अमली पदार्थ विरोधी कारवाई, प्रबोधन व व्यसनमुक्ती यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून अमली पदार्थांच्या संकटाचे लवकरच समूळ उच्चाटन होईल, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आपली नियुक्ती झाली, तेव्हा अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान उभे होते. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात अमली पदार्थ विरोधी एकूण 41 गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये 62 आरोपींना अटक करून जवळपास 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात यश आले. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तिंवर उपचारासाठी कायम स्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करत आहोत. प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे खबऱ्यांना बक्षीसही देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
बळीराजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात 172 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. सन 2023-24 खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून साडेतीन लाख शेतकऱ्यांना 141 कोटी 84 लाख रूपये विमा भरपाई देण्यात आली आहे. हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये 10 हजार 687 शेतकऱ्यांना 29 कोटी 85 लाख रूपये अनुदान दिले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये सन 2024 – 25 मध्ये 563 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 13 कोटी 62 लाख रूपये अनुदान मंजूर केले आहे. या योजनेमध्ये सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हा परिषद कृषि विभागाने खरीप 2025 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर शेतीसाठी ड्रोन वापर प्रशिक्षण व अनुदानावर ड्रोन पुरवठा योजना सुरू केली आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात 46 ठिकाणी एकूण 317 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी प्रगतीपथावर आहे. त्यातील बसर्गी, जिरग्याळ (ता. जत), माडगुळे, लिंगीवरे (ता. आटपाडी) आणि मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एकूण 27 मेगावॅट क्षमतेचे पाच प्रकल्प सुरू झाले आहेत. पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून जिल्ह्यात 4 हजार 742 ग्राहकांनी घराच्या छतावर अनुदानित सोलर पॅनल बसवले आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी शासकीय रूग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून सांगली व मिरजच्या शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागासाठी लॅप्रोस्कोपी मशिन सुरू केले आहे. शासकीय रूग्णालयात चार हजारहून अधिक प्रसूती व दीड हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या.
कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक कामगाराच्या श्रमावरच राज्याची प्रगती होत असून सर्व उद्योग घटकात व अन्य क्षेत्रात काम करीत असलेल्या कामगार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अनेक सांगलीकरांनी जिल्ह्याची शान वाढवली असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित जिल्ह्यातील पाच क्रीडापटूंचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. तसेच, राष्ट्रपती पदकाने सन्मानित महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन कासाप्पा माने, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गौरवण्यात आलेले महानगरपालिकेच्या सुनिल माळी, बाबूराव कोळी आणि राजेंद्र कदम, पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित सहा पोलीस अंमलदारांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कैलासवासी दादुकाका भिडे मुलांचे निरिक्षणगृह या संस्थेस उत्कृष्ट निरिक्षण गृह तसेच, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित मुलींचे बालगृहास बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याच संस्थेतील कुमारी निकिता अभ्यंकर ही शासकीय परिचारिका पदावर रायगड येथे सेवेत रूजू झाली आहे. दिलासा भवन, मिरज संस्थेतील प्रथमेश चौगुले यांची कर निरीक्षकपदावर निवड झाली आहे. या सर्वांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, पोलीस बँड, श्वान, निर्भया, बीडीडीएस, अग्निशमन, दंगल नियंत्रक पथक आदि पथकांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी, क्रीडापटूंचा गौरव
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित जिल्ह्यातील पाच क्रीडापटूंचा सन्मान करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील अतिउंचीच्या भागात कर्तव्य पार पाडत असताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्याने अपंगत्व आलेले नायक धाकरेश बापू जाधव यांना सैनिक कल्याण विभागातून देण्यात येणारी वीस लाखांची आर्थिक मदत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.