मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये बांधलेले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यानंतर मी पहिली पोस्ट केली होती. त्यांना (पाकिस्तानला) धडा शिकवणे आवश्यक होते. युद्ध हा हल्ला असा समानार्थी शब्द नाही. पाकिस्तान आधीच उद्ध्वस्त झालेला देश आहे. आतापर्यंत हल्ला करणाऱ्यांना आपण शोधू शकलो नाही. त्यांना शोधणे ही पहिली जबाबदारी आहे.”
जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारण्यात आले की पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याबद्दल त्यांचे काय मत आहे? त्यावर राज ठाकरे म्हणाले, “जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तिथून ते बिहारला गेले. मॉक ड्रिलऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा, आपल्या देशाचे प्रश्न संपत नाहीत. तुम्ही कुठे युद्ध पुकारणार आहात?” या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. एकीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’साठी देशभरातून भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सरकारवर टीका करणारे राज ठाकरे आहेत.
९/११ नंतर अमेरिकेने युद्ध छेडले नाही
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही, असे राज ठाकरे म्हणतात. पाकिस्तानला असा धडा शिकवणे आवश्यक होते, पण युद्ध करणे किंवा हवाई हल्ले करणे योग्य नाही. राज ठाकरे यांनी असा दावा केला आहे की जेव्हा अमेरिकेत ९/११ चा ट्विन टॉवर हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून काढले आणि त्यांना ठार मारले. यानंतर, युद्ध लढले गेले नाही कारण युद्ध हे दहशतवादाचे उत्तर नाही.
लोकांचे लक्ष विचलित करणे योग्य नाही
राज ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने मॉक ड्रिलऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करावे. एवढेच नाही तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात गुप्तचर यंत्रणेत त्रुटी असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जिथे हजारो पर्यटक नेहमीच येतात त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? ते म्हणाले की हवाई हल्ल्यांद्वारे किंवा युद्ध करून लोकांचे लक्ष विचलित करणे हा पर्याय नाही.