पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं. यावेळी ते भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर खरी राष्ट्रावादी कोणाची यावरून अनेक वाद-विवाद व्हायचे. दरम्यान, निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली. परंतु, आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं वारं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र यावं अशी जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत राज्यभर अनेक ठिकाणी पोस्टरदेखील लावण्यात आले होते. या चर्चेसोबत दोन्ही पवा देखील एकत्र येणार की काय ? अशी चर्चा सुरू असताना आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानं दोन्ही पवार एकत्र येणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला. यावर अनौपचारिकपणानं बोलताना शरद पवार म्हणाले की, "दोन्ही पवार एकत्र येण्याबाबतचा अधिकार हा सुप्रिया सुळे यांना आहे. एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजितनं बसून ठरवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करताना आज जे लोक बाजूला गेलेत, ते सगळे एकत्र होते. त्यां सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळं भविष्यात जर हे सगळे एकत्र आले, तर मला आश्चर्य वाटणार नाही. आज माझे सगळे खासदार एक मताचे आहेत. आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. कारण आमदारांना मतदारसंघाची कामे असतात म्हणून ते अस्वस्थ असतात. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील."