नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे मा.केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यालयात मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि त्याची अंमलबजावणी विशेषतः महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, तसेच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल आणि फलदायी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मा.धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण आणि अतुलनीय कार्याला शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्यासाठी #NCERT ला निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य जीवन व त्यांचा गौरवशाली वारसा हा आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी एक महान प्रेरणास्त्रोत आहे, आणि त्यामुळे त्याला शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक करत त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आश्वस्त केले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला NEP 2020 अंतर्गत समग्र, समावेशक आणि २१व्या शतकाच्या गरजेनुसार आधुनिक शिक्षण प्रणाली निर्माण करण्यात पूर्ण सहकार्य करेल. ही बैठक शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि मूल्याधारित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरली.