देगलूर : सीमाभागात कर्तव्यावर असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचे श्रीनगर परिसरात वाहन दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी (दि.६) रोजी सदरची घटना घडली आहे. सीमाभागात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याने श्रीनगरची सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्याने त्यांचे पार्थिव श्रीनगर ते दिल्ली रस्ते मार्गाने शुक्रवारी दि.९ रोजी येईल. शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून देगलूर नगरपालिका शेजारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील तमलूर येथील मूळनिवासी व सध्या देगलूर येथे राहणारे सचिन वनंजे हे २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात रूजू झाले होते. ते मंगळवारी (दि. ६) श्रीनगर मध्ये कर्तव्यावर असताताना जवानांना घेऊन जात असताना त्यांचे वाहन ८ हजार फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.