पुणे: भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मोठे हल्ले केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या 24 मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने देखील तो प्रयत्न हाणून पडला. तसेच पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. दरम्यान या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुणे पोलिस देखील सतर्क झाले आहे.
पुणे शहरात देखील भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील शिवाजी रस्त्यावर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमरणात गर्दी करत असतात.
दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाल्याने देशातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच दृष्टीने पुणे पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. दगडूशेठ हलवाई गणती मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. इथे येणारया प्रत्येकावर लक्ष ठेवले जात आहे.
पुणे शहरात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच संवेदनशील भागात नाकाबंदी केली जात आहे. पुण्यातील अनेक भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र झाला सज्ज
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झालं आहे. यामुळे देशाच्या उत्तरेकडील सीमा भागांतील राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरसह पंजाब, राजस्थान, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने पार पडलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “येत्या दोन ते तीन दिवसांत नौदल, वायूदल, लष्कर, भारतीय तटरक्षक दल यांच्याशीही चर्चा होईल. महाराष्ट्र शासनाकडून जे काही सहकार्य हवं असेल त्याबाबतही चर्चा होईल.
आज सुरक्षा सचिवांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने सगळ्यांनाच अलर्ट करण्याची चर्चा आज झाली. तसंच खोट्या बातम्या सोशल मीडियावरुन पसरवल्या जातात तो गंभीर गुन्हा आहे. त्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबतही चर्चा आणि निर्णय झाला आहे. लोकांना आमची विनंती आहे की सैन्य दलांकडून, तट रक्षक दलांकडून जी काही तयारी केली जाते आहे त्याचं चित्रीकरण करुन, व्हिडीओ काढून प्रसारित करु नये. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, त्याबाबतही चर्चा झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.