मुंबई : मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या लष्करी जवानांना भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कर्तव्यावर असताना सीमेवर वीरमरण आले. देशभरातून या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दोन्ही जवानांच्या बलिदानाला सलाम केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत म्हटले कि, मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या लष्करी जवानांना कर्तव्यावर असताना सीमेवर वीरमरण आले. दोन्ही शहीद वीराना भावपूर्ण श्रद्धांजली. संपूर्ण भारत देश तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुमच्या बलिदानाला माझा सलाम!, असे उद्गार पाटील यांनी काढले.
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे शहीद झाले. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. भारतीय सैन्यांत देशसेवा बजावणाऱ्या शहीद मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक याला थांबविण्याचा प्रयत्नही केला. तो म्हणाला होता कि, देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन. परंतु मुरली नाईक त्यांना पाकिस्तानी हल्ल्यात वीर मरण आले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
६ मे रोजी जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं ८००० फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले २९ वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये अपघातात वीरमरण आलेल्या नांदेडचे जवान सचिन वनंजे यांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील देगलूर इथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी भारताच्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक उपस्थित होते. आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला.