आदमपूर: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहालगाम हल्ल्याचा बदल घेतला आहे. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. काल रात्री देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधन केले. तर आज अचानक पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले.आदमपूर एअरबेसवरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले.”
“कोणत्या प्रकारची अणुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. भारताची लक्ष्मण रेषा एकदम स्पष्ट आहे. पाकिस्तानने नागरी विमानांच्या मागून भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे हल्ले परतवून लावले. आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या पद्धतीने उत्तर देईल”, असे मोदी म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी हे एअरबेसवर दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. आदमपूर येथे भारताचे मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या शूर जवानांचे कौतुक केले आहे.
भारत माता की जय हा आवाज देशातील त्या प्रत्येकाचा आहे जो देशासाठी काहीतरी करु इच्छितो. ज्यावेळी आमचे ड्रोन्स आणि मिसाईल शत्रूचा लक्ष्यभेद करतात, त्यावेळी शत्रूला फक्त भारत माता की जय ही घोषणा ऐकू येते. अंधारात ज्यावेळी स्फोट उडतात आणि शत्रूचा परिसर प्रकाशमय होतो त्यावेळी त्यांना भारत माता की जय हा आवाज ऐकू येतोय.
जगाने भारतीय वायूदलाची ताकद पाहिली. आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे. यापुढे ज्यावेळी भारतीय पराक्रमाची चर्चा होईल त्यावेळी लष्कराच्या कामगिरीची नोंद घेतली जाईल. भारतीय लष्कर हे देशातील युवकांसाठी प्रेरणा बनले आहे.
भारतीय लष्करामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या कार्याला सलाम करतोय. ऑपरेशन सिंदूर हे काही सामान्य सैन्य अभियान नव्हतं. ते भारताचे नीती, आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे.
भारत बुद्धांची धरती आहे... तसेच गुरू गोविंदसिंहांची देखील धरती आहे. अधर्माचा विनाश करण्यासाठी भारत आता हाती शस्त्र घेणार.
ऑपरेशन सिंदूरमध्ये, मनुष्यबळ आणि यंत्रांमधील समन्वय देखील आश्चर्यकारक होता. भारताकडे पारंपरिक संरक्षण व्यवस्था आहे ज्याने अनेक युद्धे पाहिली आहेत. एस-400 ने आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमला अभूतपूर्व बळ दिले आहे. एक मजबूत सुरक्षा कवच ही भारताची ओळख बनली आहे. पाकिस्तानने अनेक प्रयत्न करूनही कुठेही काहीही नुकसान झाले नाही.
आता ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी न्यू नॉर्मल आहे. यापुढे भारतावर जर पुन्हा हल्ला झाला तर आम्ही तीन पद्धतीचा वापर करू
जर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ.
भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही.
दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सरकारला, दहशतवादाच्या सूत्रधारांपासून वेगळे मानले जाणार नाही.