छत्रपती संभाजीनगर : उद्योगपतीच्या घरी दरोडा टाकून तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना बजाजनगरमध्ये घडली. संतोष लड्डा असं या उद्योजकाचं नाव असून लूटमारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची कसून तपासणी केली जात असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तब्बल 8 किलो सोनं व 40 किलो चांदीचे दागिने लंपास
बजाजनगर येथील आरएल सेक्टरमधील प्लॉट नंबर 93 मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात गुरुवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी तब्बल 8 किलो सोनं व 40 किलो चांदी व रोख रक्क्म चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांची वाळूज एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो कॉम्प्स नावानं के 237 भागात कंपनी आहे. ते कुटुंबीयांसह 8 मे रोजी विदेशात गेले आहेत. दरम्यान, संतोष लड्डा यांचा चालक संजय झळके हे घराची देखभाल करत होते. ते रात्री घरात एकटेच झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी घरात असलेले तब्बल 8 किलो सोनं व 40 किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटनेची माहिती कळताच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह सहायक पोलीस उपायुक्त संजय सानप, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रामेश्वर गाडे यांची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. दरम्यान, "पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या हालचाली तपासल्या. तसंच श्वान पथकाला पाचारण करून दरोडेखोरांचा माग घेण्यात आला. तर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः घटनाक्रम समजून घेत तपासकामांबद्दल सूचना दिल्या. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे," अशी माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली आहे.