अमेरिका : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, दोन्ही देशांकडून सैन्य दलाच्या कारवाया सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये, भारतीय वायू दलाने आपली ताकद दाखवून दिल्याने जगाचे लक्ष याकडे लागले होते. त्यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन भारत-पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी ट्वटि करुन दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे आपणच यात मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. त्यानंतर, वारंवार ट्रम्प यांनी तो उल्लेख करत, भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी थांबवावी अन्यथा दोन्ही देशांसोबत अमेरिका व्यापार संबंध तोडून टाकेल, असा दबावच टाकल्याचे म्हटले. त्यानंतर, आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत भारतात ॲपल कंपन्या न उभारण्याचा सल्ला ॲपलचे सीईओ टॅम कुक यांना दिला आहे.
ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारतातून प्रश्नचिन्ह उपस्थित :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळल्यानंतर, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारतातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भारताने स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तान वादात तिसऱ्या कोणत्याही देशाने मध्यस्थी करण्याची गरज नाही. त्यानंतर, आता ट्रम्प यांनी ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात कारखाने उभारण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. “माझं टिम कुकसोबत बोलणं झालं. तो भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं – मला भारतात काहीही नकोय,” असे ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत सांगितले. या चर्चेनंतर ऍपल अमेरिकेत उत्पादन वाढवणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजनांना मोठा धक्का बसू शकतो. ॲपल कंपनी सध्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोनचे उत्पादन करत आहे. पुढील वर्षअखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी आयफोन आयात करण्याची ॲपलची योजना आहे. सध्या ॲपलचे एकही आयफोन उत्पादन युनिट अमेरिकेत नाही. ट्रम्प यांच्या सल्ल्यानंतर ॲपल अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
९० दिवसांची शुल्क सवलत जाहीर :
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ९० दिवसांची शुल्क सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी चर्चा केली. भारतात आयफोन निर्मितीबाबत ॲपलच्या योजनांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, “भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारत स्वतःचं पाहू शकतो.” कुक अमेरिकेत आणखी प्लांट्स उभारण्याचा विचार करत आहेत. ॲपलने याआधीच अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याच वेळी कंपनीने भारतातही आयफोन उत्पादन वाढवण्याची घोषणा केली होती.
ॲपलचे आयफोन मुख्यतः फॉक्सकॉनच्या दक्षिण भारतातील युनिटमध्ये तयार होतात. टाटा समूहाने विस्ट्रॉनचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे आणि पेगाट्रॉनचे कामकाजही चालवत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा आणि फॉक्सकॉन दोघेही भारतात नवीन कारखाने उभारत आहेत. मार्च २०२४ पर्यंतच्या १२ महिन्यांतॲपलने भारतात सुमारे २२ अब्ज डॉलर्स (सुमारे १.८३ लाख कोटी रुपये) किमतीचे आयफोन तयार केले आहेत, ज्यात ६०% वाढ नोंदवली गेली आहे. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे ॲपलच्या भविष्यातील भारतीय उत्पादन धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.