नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईने शेजारील देशात खळबळ उडवली असून, पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलने केलेल्या धक्कादायक खुलासामुळे प्रकरणात नव्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी सांगितले की, भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानला मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानचा भोलारी एअरबेस उद्ध्वस्त झाला आहे. मसूद अख्तर यांनी दावा केला आहे की, भारताने या कारवाईत ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता.
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर : भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम
भारताच्या जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानने या कारवाईनंतर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेच्या तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. याच संदर्भात माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी सांगितले की, "माझी काही लोकांशी चर्चा झाली होती. त्या ठिकाणी 4 सर्फेस टू सर्फेस ब्रह्मोस क्षेपणास्त्रं आली होती. सर्फेस टू सर्फेस की एअर टू सर्फेस, हे मला नक्की माहिती नाही. सर्वात आधी पायलट धावत गेले आणि त्यांनी आपल्या विमानांना सुरक्षित करण्यास सुरुवात केली. क्षेपणास्त्र थेट भोलारीमध्ये येऊन एका हँगरवर लागलं. तिथे आमचं AWACS विमान उभं होतं, तिथे त्याचे नुकसान झाले," असे त्यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यात पाकिस्तानच्या अत्यंत महत्त्वाच्या AWACS विमानाला मोठे नुकसान झाले. हँगरवर थेट हल्ला झाल्याने काही अधिकारीही मृत्युमुखी पडले, असे त्यांनी कबूल केले. हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी वैमानिक विमानांना सुरक्षित स्थळी हलवू लागले, पण तोपर्यंत नुकसान होऊन गेले होते.
अख्तर यांच्या मते, भारताने वापरलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत अचूक आणि वेगवान आहे. पाकिस्तानने हे क्षेपणास्त्र रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः निष्क्रिय ठरली.“आमच्या संरक्षण व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र रोखू शकले नाही. हल्ला इतका वेगवान होता की, कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही,” असे मसूद अख्तर म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान हादरला
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तान घाबरला. भारताने दहशतवादाविरुद्ध ही कारवाई सुरू केली होती, पण पाकिस्तानी सैन्यानेही त्यात उडी घेतली. पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक हल्ला अयशस्वी झाला. तर पाकिस्तान भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईला रोखू शकला नाही. भारताने पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहे.
भारताची धडाडी आणि संदेश
भारताने ब्रह्मोससारख्या अचूक आणि धोकादायक क्षेपणास्त्रांचा वापर करत, केवळ प्रतिशोध घेतला नाही, तर दहशतवादाला मदत करणाऱ्या यंत्रणांना थेट इशारा दिला आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी एअर मार्शलचा हा खुलासा पाकिस्तानसाठी केवळ लाजिरवाणा नाही, तर पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक मानले जात आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे दक्षिण आशियात सामरिक गणिते नव्याने आखली जात आहेत, आणि भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला कोठेही थारा दिला गेला तर त्याचा अचूक आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.