मुंबई – मुंबईमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत टॅक्सी चालकाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबई शहरात एकच खळबळ माजली असून खासगी टॅक्सीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला आणि मुली राज्यामध्ये सुरक्षितपणे कधी श्वास घेऊ शकणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
टॅक्सी चालकाने मुलीसोबत गैरवर्तन केल :
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती पवई येथे राहते. बुधवारी ती प्रभादेवी येथील एका शैक्षणिक संस्थेत गेली होती. तेथील काम संपल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तिने घरी जाण्यासाठी एका खासगी ॲप आधारित कंपनीच्या टॅक्सीचे बुकिंग केले. ठरलेल्या वेळेनुसार टॅक्सी आली आणि ती त्यात बसली.मुलीने घरी जाण्यासाठी पवईचा पत्ता टाकला होता. मात्र, टॅक्सी चालकाने गाडी त्या पत्त्यावर न नेता, थेट पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका सुनसान ठिकाणी नेऊन थांबवली. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्या नराधम टॅक्सी चालकाने मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि तिचा विनयभंग केला.
आरोपी चालकाचा कसून शोध सुरु :
घडलेल्या प्रकारामुळे पूर्णपणे हादरलेली ती मुलगी कशीतरी आपल्या घरी पोहोचली. तिने हिंमत एकवटून आपल्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या मुलीसोबत जे घडले ते ऐकून तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला, पण त्यांनी तात्काळ न्याय मिळवण्यासाठी आणि त्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या मुलीसोबत दादर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला व तक्रार नोंदवली.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी उबेर चालकावर 75, 79 बीएनएस 2023 सह कलम 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सध्या आरोपी चालकाचा कसून शोध घेत आहेत. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे खासगी ॲप आधारित टॅक्सींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण या टॅक्सींना सुरक्षित मानले जाते. मात्र, अशा घटनांमुळे आता महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.