कोल्हापूर :- अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३.०० वा. बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
या विषयात राज्य शासन अत्यंत संवेदनशील असून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या ठाम विरोधात आहे प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच या विषयाशी संदर्भात सर्व संबंधितांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गांभीर्यपूर्वक लक्ष देत आहेत. जलसंपदा मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांबाबत चर्चा करून त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.