सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, कोण आहे व्हिलन करिश्मा हगवणे?

डिजिटल पुणे    23-05-2025 15:21:56

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंबच चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे ही या प्रकरणातील एक महत्त्वाची आणि वादग्रस्त व्यक्ती बनली आहे. वैष्णवीची थोरली सून मयुरी जगताप आणि वैष्णवीच्या वडिलांनी करिश्मावर थेट मानसिक व शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर वैष्णवीच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्येही नणंदेने त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. 

घरातील प्रत्येक निर्णय हा करिश्मा म्हणजेच पिंकी ताई घ्यायच्या असं तिने सांगितलं. त्याचबरोबर वैष्णवीने आपल्या मैत्रीणीला घरातील त्रासाबाबत सांगताना नणंदेने दिल्याल्या त्रासाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये केला होता. वैष्णवीच्या वडिलांनीदेखील माध्यमांना यासंदर्भता माहिती दिली आहे. दरम्यान ही पिंकी ताई कोण आहे? ती करते काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

करिश्मा ही हगवणे कुटुंबातील थोरली आणि अविवाहित सदस्य असून सध्या तिचं वय 34 वर्षं आहे. घरातील सर्व निर्णय तिच्याच सल्ल्याने घेतले जात असल्याचे सांगितले जाते. ती ‘पिंकीताई’ या नावाने ओळखली जाते. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावल्याचे आणि तिचा मानसिक छळ केल्याचे आरोप समोर आले आहेत.

फॅशन डिझायनर ते कौटुंबिक सत्ता – कोण आहे व्हिलन करिश्मा हगवणे?

करिश्मा हगवणे ही फॅशन डिझायनर असून ‘लक्ष्मीतारा’ या नावाने तिने स्वतःची डिझायनिंग कंपनी सुरू केली आहे. ती सध्या पालकांसोबत मुळशी तालुक्यात राहते. तिच्या दबदब्याचा प्रभाव इतका होता की, घरात कोण कोणाशी बोलेल, कोण कशी वागेल, हेही तीच ठरवत असे. मयुरी आणि वैष्णवी एकाच घरात राहूनही त्यांना एकमेकींशी बोलण्यासही मज्जाव होता.मयुरी जगतापनेही करिश्मावर गंभीर आरोप करत, ती आणि तिची आई लता हगवणे यांनी स्वतःलाही शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असं सांगितलं. गावात कुणाशी बोलू नये म्हणून अडवण्यापासून ते वैष्णवीच्या बाळाला भेटू देण्यास नकार देण्यापर्यंत अनेक प्रकार मयुरीने उघड केले. नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलिसांत तक्रार दाखल करूनही ती दडपल्याचा तिचा दावा आहे.

करिश्मा ही वैष्णवीची नणंद आहे. तिच्यावर वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. सुशील हगावणेची पत्नी मयुरी जगताप हिनेही तिच्यावर असाच आरोप केला आहे. करिश्मा हगवणेच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, करिश्मा एक फॅशन डिझायनर आहे. तिचा 'लक्ष्मीतारा' नावाचा एक ब्रँड आहे. रिपोर्टनुसार, तिचे दुकान कोथरुडमध्ये आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर, तिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

सध्या करिश्मा हगवणे पोलिस कोठडीत असून तिच्यावर गंभीर आरोप आहेत. तिच्या कुटुंबातील वर्चस्व, कौटुंबिक हिंसाचार आणि वैष्णवीसारख्या तरुण विवाहित महिलेला आत्महत्येपर्यंत नेणारी पार्श्वभूमी आता संपूर्ण राज्याला अस्वस्थ करत आहे.


 Give Feedback



 जाहिराती