सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 विश्लेषण

वैष्णवीला श्रद्धांजली म्हणून सुप्रिया सुळेंचा निर्णायक पाऊल; ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची घोषणा

डिजिटल पुणे    23-05-2025 17:50:46

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब’ या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली असून, याचे औपचारिक उद्घाटन २२ जून २०२५ रोजी होणार आहे.वैष्णवी हगवणे ही २३ वर्षीय विवाहित महिला सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केल्याने संतापाचा व दुःखाचा सूर समाजभर उमटला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही घटना केवळ दुःख व्यक्त करून विसरून चालणार नाही, तर कृतिशील पावलं उचलणं हेच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल.”

“हुंडा देणे आणि घेणे, दोन्ही गुन्हा आहे”; समाजजागृतीचा निर्धार :

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स  हँडलवरून ही माहिती दिली. “ज्या महाराष्ट्राने स्त्रीमुक्तीच्या लढ्यात देशाला दिशा दिली, तिथे वैष्णवीसारख्या लेकीचा हुंडाबळी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे यानंतर एकही मुलगी अशा दुर्दैवाला सामोरी जाणार नाही यासाठी राज्यभर जनजागृती केली जाणार आहे,” असं त्या म्हणाल्या.

या मोहिमेंतर्गत वर्षभर विविध स्तरांवर, समाजाच्या प्रत्येक घटकासह संवाद साधून, कार्यशाळा, चर्चासत्रं आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे. “हा जागर आहे आपल्या लेकींचा, त्यांच्या सन्मानाचा, त्यांच्या सुरक्षित भवितव्याचा,” असं सुळे यांनी नमूद केलं.

सर्वांच्या सहभागातूनच परिवर्तन शक्य :

या अभियानात सरकारी, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असणार आहे. सुप्रिया सुळे यांनी आवाहन केलं की, “आपण सर्वांनी या मोहिमेत एकदिलाने सहभागी व्हावं आणि ‘हुंडामुक्त महाराष्ट्र व हिंसामुक्त कुटुंब’ घडवण्यासाठी पुढे यावं. माझे सर्व भाऊ-बहिणींना नम्र आवाहन आहे की, कृपया आपण हे पाऊल वैष्णवीसाठी उचलूया.”या अभियानात हुंडा विरोधी कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आणि स्त्रीसुरक्षा यासारख्या विषयांवर लोकजागृती करण्यात येणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामुळे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर एक सकारात्मक सामाजिक चळवळ उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती