सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

रुपाली चाकणकर यांनी घेतली कस्पटे परिवाराची भेट; मात्र दारातच विचारला गेला जाब

डिजिटल पुणे    23-05-2025 18:01:59

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणामध्ये तिच्या सासऱ्याच्या राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. वैष्णवी हगवणे हिला तिच्या नवऱ्यासह सासरा, सासू आणि नंणदेने मारहाण केली असून तिच्या शरिरावर अनेक व्रण असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कास्पटे परिवाराची भेट घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कास्पटे परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आई वडीलांचे सांत्वन देखील केले. तसेच माध्यमांशी संवाद देखील साधला आहेत. रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली की, वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा,सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे.गुन्हा नोंद आहे,आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

महिला आयोगाच्या अध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी कास्पटे परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. मात्र यानंतर कास्पटे परिवाराच्या घराबाहेर त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. छावा संघटनेच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकरांना घेरले. मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांना सुनावले. तसेच संविधानिक पदावर असल्यामुळे तुम्ही भूमिका मांडणार नाही, तर असं चालत नाही. तुम्ही आधी दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती. हे अति होत नाहीये. तर तुम्ही बोलले पाहिजे. कास्पटेच्या दारामध्ये येऊन तुम्हाला विनंती करावी लागती की बोला म्हणून. ज्या पदावर आहात त्याची गरिमा सांभाळा, अशा शब्दांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांना खडेबोल सुनावले आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या कास्पटे परिवाराने न्यायाची मागणी केली होती. याचबरोबर तिचे 9 महिन्यांचे बाळ देखील बेपत्ता होते. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे या राजकीय पार्श्वभूमीमधील होता. या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे याची अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी कास्पटे परिवाराची भेट घेतली त्यांना बाळाचा ताबा मिळवून दिला. तसेच या प्रकरणामध्ये पक्षाचा कोणताही पाठिंबा राजेंद्र हगवणेला नसल्याचे देखील रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले होते.

 


 Give Feedback



 जाहिराती