पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक असलेले राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यावर या तिघांना न्यायालयात हजर केलं होतं. यात निलेश चव्हाण याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर राजेंद्र आणि सुशील हगवणे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणी आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणे आणि सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी कोर्टात केलं होतं. आज या तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे न्यायालयात यावर सुनावणी झाली. पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्याकारणाने आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. यावर आरोपी सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
वैष्णवी हगवणे हिनं सासरकडून होणाऱ्या त्रासाला आणि छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला. हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना अटक केली होती. फरार असलेल्या निलेश चव्हाण यालाही नेपाळ सीमेवरुन अटक केली होती.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटक असलेला सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी युक्तिवादामध्ये म्हटलं की, "निलेश चव्हाण याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आलाय. तसंच हगवणे कुटुंबियांचे २ मोबाईल निलेशकडे आहेत. निलेश आणि हगवणे कुटुंबिय यांच्यात चॅटिंग झालं आहे. तसंच निलेश आणि हगवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडं होतं. त्यानं त्या बाळाची हेळसांड केली आणि याचा तपास करायचा आहे." पाच दिवसांची कोठडी निलेश याला देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोर्टात काय घडलं?
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज पुणे कोर्टात हजर करण्यात आले. बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टासमोर उभे केले. सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल्सचा तपशील सादर केला. या मोबाईल्समध्ये हगवणे कुटुंबीयांचे दोन मोबाईल्स असून, निलेश आणि हगवणे कुटुंबीयांमध्ये चॅटिंग आणि आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीचे बाळ होते का आणि त्याने बाळाची हेळसांड केली का, याचा तपास करण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. कोर्टाने याची दखल घेत निलेशला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
निलेश चव्हाणच्या वकिलांचा युक्तिवाद
निलेश चव्हाणच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, निलेशची सर्व चौकशी पूर्ण झाली असून कोणताही मुद्दा शिल्लक नाही. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि निलेशला पोलीस कोठडी सुनावली.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवीला होत असलेला सासरकडचा त्रास, मारहाण यामुळे वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं, मात्र ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असा संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता सर्वच दृष्टीकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन 71 किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे. हा घरातील पंखा वैष्णवीचं 71 किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी साडी, पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. या शिवाय निलेश चव्हाणच्या ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला. मात्र, तो माझा नाहीच, असे निलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर लॅपटॉमध्ये काय आहे याचा उलगडा होणार आहे.