पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय आणि मलाबार गोल्ड औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब विभागातर्फे महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, ग्रीन क्लब समन्वयक डॉ. राणी भगत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अनुपमा कदम तसेच मलाबार गोल्ड संस्थेचे प्रतिनिधी श्री. जिरेश आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सर्वप्रथम पर्यावरण दिनाची संकल्पना व महत्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी असे आवाहन करत सध्या पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक, हरितगृह वायू परिणाम, बेसुमार वृक्षतोड अशा विविध प्रश्नावर चिंता व्यक्त केली.पर्यावरणपूरक व शाश्वत उपक्रमांकरिता प्रसिद्ध मलाबार गोल्ड औंध, पुणे यांचे प्रतिनिधी श्री. जिरेश यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस.आर) अंतर्गत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत माहिती देत बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या सहकार्याने सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन करणे संस्थेसाठी भूषणावह असल्याचे नमूद केले.सदर वृक्षारोपण उपक्रमात जास्वंद, सदाफुली, नीम, गुलमोहोर, गुलाब अशा प्रजातींची ५० पेक्षा अधिक रोपे महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आली. यामधे विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रोपांचे जतन व पर्यावरण जनजागृतीची शपथ घेतली. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.