कोल्हापूर : एकतर्फी प्रेमात अडसर बनणाऱ्या मित्राला दगडाच्या खाणीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना गेल्या बुधवारी (दि.3) केर्लेपैकी हनुमान नगरमध्ये घडली. महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18) असं खून झालेल्या मुलाचं नाव असून सुरुवातीला हा अपघात असल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.
आरोपीचं एकतर्फी प्रेम
मिळालेल्या माहितीनुसार केर्ले गावामधील महेंद्र आणि अल्पवयीन आरोपी मित्र लहानपणापासून जिवलग मित्र होते. इतकंच नव्हे तर एकाच बाकड्यावरती ते बसत होते. दोघांनी सुद्धा बारावी परीक्षा एकत्रित पास केली होती. इतकी या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र, या मैत्रीमध्ये एका मुलीची एन्ट्री झाल्याने दोघांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार महेंद्रचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीवर अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे महेंद्र आणि ती मुलगी एकमेकांशी बोलून भेटून त्यांचं फिरणं सुरू असल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन आरोपी मित्राला याचा राग येत होता.
महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली
त्यामुळे एकतर्फी प्रेमात आपलाच जिवलग मित्र महेंद्र हा प्रेमामध्ये अडचण वाटू लागला होता. त्यामुळे या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये वाद सुद्धा झाला होता. दरम्यान 3 जून रोजी महेंद्रला अल्पवयीन आरोपीने मोहित्यांच्या खाणीजवळ बोलवून घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी आरोपी अल्पवयीन मित्राने महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली. यानंतर आणखी वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने जोरदार धक्का दिल्याने महेंद्र सव्वाशे फूट खोल खणीत कोसळला. यामुळे महेंद्रला गंभीर धोखापत झाली होती. फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता खणीमध्ये तो पडून होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून काढले असता शेवटचे लोकेशन खणीजवळच सापडून आले. संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबूली दिली.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित अल्पवयीन मुलानं महेंद्रला फोन करून खणीजवळ बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये मुलीच्या विषयावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली. संशयित आरोपीनं रागाच्या भरात महेंद्रचा मोबाईल हिसकावून घेऊन फोडला तसंच दुचाकीची चावी देखील फेकून दिली. शाब्दिक वादावादीचं रूपांतर हाणामारीवर झालं आणि या झटापटीत संशयित आरोपीनं महेंद्रला जोरदार धक्का देत 125 फूट खोल खाणीत ढकलून दिलं. बराच वेळ महेंद्र घरी आला नसल्यामुळं कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. यावेळी महेंद्र हा बेशुद्ध अवस्थेत खाणीत कुटुंबीयांना सापडला. त्याला तातडीनं त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. कुटुंबीयांची चौकशी केली असता मित्राचा फोन आल्यानंतर महेंद्र घराबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महेंद्र आणि संशयित आरोपीचं मोबाईल लोकेशन डिटेल्स एकच दाखवत होतं. यावरून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच हा खून केल्याची कबुली त्यानं दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केलं असता संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं पंधरा दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी केलीय. दरम्यान, मित्रानेच मुलीसाठी मित्राचा खून केल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतेय.