सातारा : साताऱ्यातील कराडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं असून या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.कराड शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यामागचा सूत्रधार स्वतःला ‘डॉक्टर’ असल्याचं सांगतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे.या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले ?
कराडमधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. महत्वाचं म्हणजे हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता, अशी माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या सांगितले की, चौकशीदरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.
AI वापरून खोटे व्हिडीओ; पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती उघड :
कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी दोन महिला डॉक्टरांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. त्यानुसार, सोशल मीडियावर त्यांचे अश्लील व्हिडीओ एका इसमाने टाकल्याची तक्रार आली होती.आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने सायबरच्या मदतीने हे व्हिडिओ कोणी टाकले आहे त्याचा तपास करत असताना विकास शर्मा या पंजाबच्या इसमाने हे केल्याचे उघड झाल आहे.तपासाअंती हे व्हिडीओ AI तंत्रज्ञानाने बनवले गेले असून, त्यात संबंधित डॉक्टर महिलांना दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह कृती करताना दाखवलं गेलं होतं.तपासादरम्यान पंजाबमधील विकास शर्मा या इसमाचा तपासात सहभाग निष्पन्न झाला असून, त्याने कबुल केलं की कराडमधीलच एक डॉक्टर राजेश शिंदे यानेच हे व्हिडीओ तयार करण्याची योजना आखली होती. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे.
पैशांसाठी ‘टास्क’; बनावट व्हिडीओ गटांमध्ये शेअर :
विकास शर्माने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, आर्थिक अडचणीमुळे त्याने हे काम केलं. आरोपी राजेश शिंदे याने त्याला काही मोबाईल क्रमांक पाठवले व त्या नंबरचे गट तयार करून अश्लील व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. यानंतर एआयच्या सहाय्याने खोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.या बनावट व्हिडीओंमुळे संबंधित महिला डॉक्टरांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकला असता, मात्र त्यांनी वेळेवर पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे व्हिडीओ व्हायरल होण्याआधीच नियंत्रण मिळवता आलं.
कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम युनिटच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सहकारी दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.हा प्रकार म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक कसा घातक ठरू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. Deepfake AI तंत्रज्ञानाचा वापर करून कुणाच्याही फोटोवर अश्लील क्लिप्स तयार करता येतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपले खाजगी फोटो, व्हिडीओ अपलोड करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.