मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय 'लाडकी बहीण योजना'वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1,500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार येतो.दरम्यान, या योजवर आता सिनेमा येणार असून नृत्यांगणा गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम आण्णा नाईक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
लाडकी बहीण योजनेवरील सिनेमात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या अभिनयाच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम लोकप्रिय अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतून समाजाभिमुख विषयांना चालना देणाऱ्या सिनेमांची परंपरा आहे. अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेला ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते असून, दिग्दर्शनाची जबाबदारी गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाचे काम शितल शिंदे यांनी साकारले आहे., ‘लाडकी बहीण’ या योजनेवर आधारित कथानक अत्यंत खेळकर आणि कौटुंबिक शैलीत सादर केले जाणार आहे.
साताऱ्यात झालेल्या मुहूर्त सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी क्लॅप दिला. या वेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटाद्वारे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनेला चित्रपटाच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रमुख भूमिका आणि संगीत संयोजन
चित्रपटात मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव आणि जयश्री सोनवले यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. छायालेखन गजानन शिंदे यांनी केले आहे, तर संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे आहे. या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात सादर होणार आहेत. नृत्यदिग्दर्शन पंकज चव्हाण यांचे असून, प्रशांत कबाडे व शिवाजी सावंत कार्यकारी निर्माते आहेत.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ या उपक्रमावर आधारलेली ही कथा असणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. याच प्रेरणादायी योजनेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. नुकताच सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेचा फायदा लाखो महिलांनी घेतला असून, गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. निर्मात्यांनी सांगितले की, “समाजोपयोगी विषयावर आधारलेला हा चित्रपट केवळ माहितीपर नसून, तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असा अनुभव देईल.” दिग्दर्शकांच्या मते, “एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्याफुलक्या शैलीत मांडत एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.”