रायगड : महाराष्ट्रात ठिकठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या २ दिवसांत धुव्वाधार पावसामुळे आधीच नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यावर पाणी साचत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सुद्धा महाराष्ट्रात अशाच प्रकारे पावसाची बॅटिंग बघायला मिळेल. खास करून कोकण किनारपट्टीला पावसाचा मोठा फटका बसू शकतो. रायगड जिल्ह्याला तर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांतील शाळांना सुट्टी लागू असेल. यामध्ये अंगणवाडी, सरकारी, खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीवर देखील झालाय. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली खोपोली रोडवर नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील उन्हेरे फाटा येथील पुलाजवळ दोन्ही बाजूस नदीचे पाणी शिरल्याने येथील मुख्य पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेगेटींग लाऊन बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दुसरीकडे सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा येथील भेराव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवरील पुलावर देखील पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा जवळील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. तर दुसरीकडे आज वादळी वाऱ्यासहित पाऊस लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अलिबाग, रोहा ,तळा, महाड पोलादपूर. या तालुक्यांत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे, रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पामध्ये 60 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तर सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरेही 9 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.