पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, साहित्य उतरवत असलेल्या पिकअपला एका भरधाव कारने धडक देऊन ८ जणांचा जागिच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाचजण पुणे जिल्ह्यातील असून, तिघे सोलापूर व उत्तरप्रदेशातील असे आहेत. अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे.दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की ८ जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जेजुरी मोरगाव रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाबा येथे एक पिकअप टेम्पो थांबला होता. त्यामधील साहित्य खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघेजण साहित्य खाली घेत होते. यादरम्यान, पुण्याकडून मोरगावकडे जाणाऱ्या एका भरधाव स्वीफ्ट डिझायर कारने या पिकअपला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारला देखील या स्वीफ्ट कारने धडक दिली. ती त्या कारवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मोरगावकडे एक स्विफ्ट डिझायर कार निघालेली होती. जेजुरी येथून मोरगावकडे जात असताना एका ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला (क्र. एमएच 42 एएक्स 1060) साहित्य खाली करत असतानाच जोराची धडक झाली. या पिकअपमधून साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात पिकअप टेम्पोतून साहित्य बाहेर काढणारे आणि कारमधील काही प्रवासी अशा एकूण आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मयतांमध्ये कारमधील चार जणांचा समावेश आहे अशी माहिती पुढे येत आहे.
अपघातातील जखमी लोकांना जेजुरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सोमनाथ रामचंद्र बायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही रा नाझरेकप ता.पुरंदर जि.पुणे, अजयकुमार चव्हाण, रा. उत्तर प्रदेश, अजित अशोक जाधव, रा.कांजळे, ता. भोर, पुणे, किरण भारत राऊत रा. पवारबाकी ता. इंदापूर, पुणे, अश्विनी संतोष येसार, रा. नागणसूर हैद्रे सोलापूर, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी ता. बारामती, पुणे अशी अपघातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.