पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. वाढदिवसाच्या दिवशी दुचाकीस्वार संगणक अभियंत तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तेजल प्रकाश तायडे (वय २७, रा. तलासरी, जि. ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात प्राची जगन्नाथ पाचंगे (वय २८, रा. डांगे चौक, थेरगाव) जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डंपरचालक राहुल भीमराव राठोड (वय २४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत प्राची पाचंगे हिने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल ही संगणक अभियंता आहे. ती नाेकरीच्या शोधात पुण्यात आली होती. गुरवारी तेजलचा वाढदिवस होता. तेजल आणि प्राची बाणेर भागातील हायस्ट्रीट परिसरातील एका हाॅटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. हाॅटेलमधून जेवण करुन तेजल आणि प्राची रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरुन ज्युपिटर हाॅस्पिटल परिसरातू दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या वेळी गणेश मंदिर चौकात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात तेजल गंभीर जखमी झाली. तेजल आणि प्राचीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. डंपरचालक राठोड याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.