भंडारा : भंडाराच्या बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरुन मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. होंडा सिटी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीला होंडा सिटीने मागेहुन जोरदार दिली. ही घटना आज (२१ जून) पहाटेच्या सुमारास घडली.
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना बायपास महामार्गावरील कोरंबी देवस्थानजवळ घडली. यात अपघातग्रस्त कुटुंब हे लाखनी येथून भंडाऱ्याच्या परसोडी या गावाकडं जात असताना हा अपघात घडला. यातील सर्व जखमींवर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देविदास नांन्हे (वय 37), कविता नान्हे (वय 32), चेतना नान्हे (वय 8), दिव्यांश नान्हे ( वय 5) असं अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पूढील कारवाई सुरू केली असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.