पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळात संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपचे पुणे शहर पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल (FIR) केला आहे. सोमवारी (23 जून) हा सर्व प्रकार घडला. भाजपच्या कार्यक्रमानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना जवळच्याच दुकानात चहा पिण्यासाठी नेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे यांनी दोनवेळा अशोभनीय व लज्जास्पद स्पर्श केला, असा आरोप संबंधित महिला पोलीस निरीक्षकाने केला आहे.
त्यावेळी प्रमोद कोंढरे यांच्यावर गर्दीचा फायदा घेऊन बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस निरिक्षकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महिला पोलीस अधिकाऱ्याने ही गोष्ट तिच्या वरिष्ठांच्या कानावर घातली. चहाच्या दुकानाजवळच हे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आलं. त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान “प्रमोद कोंढरे याने राजीनामा पाठवला आहे. हे नक्की कशामुळे घडलं याची माहिती घेत आहोत. मात्र, काही ठिकाणी गर्दी असते हे अनावधानाने घडलं का? याची माहिती घेवू. पोलीस चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात तपासाअंती कळेल. मात्र मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कळल्यानंतर आम्ही तातडीने पाऊल उचलली आहेत. शहर भाजप मध्ये कुठलेही दोन गट नाहीत काहीही बातम्या पसरवू नका” असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले. प्रमोद कोंढरे याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले.
संबंधित महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार पोहोचवण्यात आली. त्यानुसार, प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.