पुणे : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी मार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने बुधवारी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2: वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब) ला पहिल्या टप्प्याअंतर्गत विद्यमान वनाझ-रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार म्हणून मंजुरी दिली आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने या विस्तारित मार्गाला मान्यता दिली होती. या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. अखेर केंद्र सरकारने या विस्तारित मार्गाला मान्यता दिली आहे.
प्रकल्प खर्च आणि आर्थिक नियोजन
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 3626.24 कोटी रुपये इतका आहे. हा खर्च भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था (द्विपक्षीय/बहुपक्षीय एजन्सी) यांच्यात समान वाटून घेतला जाईल. हा विस्तार सध्याच्या कॉरिडॉर-2 चाच तार्किक विस्तार आहे. पुणे शहराच्या 'व्यापक गतिशीलता योजने'शी हा प्रकल्प सुसंगत आहे. यात पूर्वेकडून पश्चिमेकडे (चांदणी चौक ते वाघोली) अखंड मेट्रो मार्गिका तयार करून सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुण्यातील वाहतुक सुधारण्यास मदत होणार
हे नवीन मेट्रो कॉरिडॉर शहरातील महत्त्वाचे आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी भागांना जोडणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि संपूर्ण मेट्रो नेटवर्कमधील प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल.नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाइन-1 (निगडी-कात्रज) आणि लाइन-3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) शी जोडले जातील. यामुळे प्रवाशांना अखंडित आणि विविध प्रकारच्या वाहतूक साधनांचा वापर करून शहरात प्रवास करणे सोपे होईल.
प्रवाशांना सहज कनेक्टिव्हिटी मिळणार
लांब पल्ल्याच्या वाहतूक नियोजनानुसार, मुंबई आणि बंगळूरुसारख्या शहरांमधून येणाऱ्या आंतरशहर बस सेवा चांदणी चौकात मेट्रोशी जोडल्या जातील, तर अहिल्या नगर (अहमदनगर) आणि छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) कडून येणाऱ्या बस सेवा वाघोली येथे मेट्रोशी जोडल्या जातील. यामुळे प्रवाशांना पुणे मेट्रो प्रणालीत सहज प्रवेश मिळेल. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोडसारख्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित, जलद व पर्यावरणपूरक प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.
मेट्रो प्रवाशांची संख्या 3.49 लाखांवर पोहोचणार?
हे दोन्ही कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर संपूर्ण लाइन 2 साठी दैनिक प्रवाशांची अंदाजित संख्या 2027 मध्ये 0.96 लाख (96,000), 2037 मध्ये 2.01 लाख, 2047 मध्ये 2.87 लाख आणि 2057 मध्ये 3.49 लाख पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) करणार आहे. महा-मेट्रो सर्व स्थापत्य, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि संबंधित कामे करेल. स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि विस्तृत डिझाइन सल्ला यांसारखी बांधकामापूर्वीची कामे आधीच सुरू झाली आहेत.
