पुणे : पुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश आले असून, पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे समस्त पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद !यामध्ये वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन उन्नत मार्ग समाविष्ट आहेत. या नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज–रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार असून, पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला गतिमान करण्यासाठी हे निर्णायक पाऊल ठरणार आहे. या मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मा.श्री. मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती.
मंजुरी मिळालेल्या या १२.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर १३ स्थानकं असतील, जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प IT हब्स, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय देईल. एकंदरीतच पुण्याची वाहतूक व्यवस्था सशक्त करणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.
हे नवीन मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहे. तसेच, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, जेणेकरून मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळेल. यामुळे पुण्यातील स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचा पाया घातला जाणार आहे.
₹३,६२६.२४ कोटींचा हा प्रकल्प महा-मेट्रोमार्फत पुढील ४ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या भविष्यासाठी, वाहतुकीच्या सुसंगत आणि शाश्वत विकासासाठी ही एक मोठी झेप आहे.