मुंबई : राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पहिली ते चौथी या प्राथमिक शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा करण्याचा मानस आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार विरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार तसेच समन्वय समिती यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून यावेळी हिंदी भाषा सक्तीबाबत मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “येत्या 29 जून रोजी आम्ही जाहीर सभा घेणार आहोत. यामध्ये सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या आदेशाची होळी केली जाणार आहे. मराठीशिवाय इतर कोणतीही भाषा आम्ही लादून घेणार नाही. सरकारने लादण्याचा प्रयत्न करु नये. हिंदी भाषा सक्ती ही सरकारची अघोषित हुकूमशाही आणि भाषिक आणीबाणी असल्याचे दिसून येत आहे. भाषेचे हे दळण कशासाठी दळत आहात,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमचा हिंदी भाषेला विरोध नाही तर हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे. तो कायम राहणार आहे. ही भाषिक आणीबाणी असून त्याचा आम्ही तीव्र विरोध करतो आहे. बाटेंगे तो काटेंगे असे धोरण केंद्र सरकारचे दिसून येत आहे. ही भाषेची सक्ती एकाधिकारशाही दाखवून देत आहे. मी सीएम असताना मला मराठी भाषेची सक्ती करावी लागली. आम्ही ही हिंदी भाषेची सक्ती आमच्या लहान मुलांवर होऊन देणार नाही. हिंदी भाषा आली नाही तर आडलेलं नाही,” असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेकडून हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “येत्या 29 जून रोजी आम्ही जाहीर सभा घेणार आहोत. 6 जुलै रोजी मोर्चा काढला जाणार आहे. पक्षीय भेदाभेद विसरुन मराठी भाषेसाठी मी सर्वांना एकत्र लढा देण्याचे आवाहन करतो. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक असा सर्व क्षेत्रातील लोकांनी मराठी भाषेसाठी एकत्र आलं पाहिजे. ज्याच्या मनामध्ये मराठी भाषा आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा सर्वांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे. भाजपमधील सुद्धा अस्सल मराठी माणसं सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात. पण भाजपमध्ये अस्सल माणसं शोधणं हा संशोधनाचा मुद्दा झाला आहे. मी मराठी माणूस म्हणून सर्वांना विनंती करतो आहे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषिकांना केले आहे.