पुणे : पुणे विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला आहे. दुबईहून पुण्याला येणारे स्पाइसजेटचे विमान प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात दाखल झाले. त्यामुळं शहरात चर्चेला उधाण आलं आहे.पुण्यात दाखल झाल्यावर प्रवासी बॅगेज बेल्टजवळ सामानाची वाट पाहत थांबले होते. काही कालावधीनंतर सामान येत नसल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. ही घटना गुरुवारी (ता.२६) सकाळी पुणे विमानतळावर घडली.
दुबईहून पुण्याला येणारे स्पाइसजेटचे (एसजी-५०) विमान प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात दाखल झाले. पुण्यात दाखल झाल्यावर प्रवासी बॅगेज बेल्टजवळ सामानाची वाट पाहत थांबले होते. बराच वेळेनंतरही सामान येत नसल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. विमानात इंधनाचा साठा वाढल्याने भार पेलण्याची विमानाची क्षमता संपली, त्यात पुन्हा सामानाचा भार नको म्हणून बॅगेज आणले नसल्याचे स्पाइसजेटने सांगितले.
दुबईहून रात्री १२.०५ वाजता निघणाऱ्या या विमानाने उशिरा उड्डाण केले. तब्बल दोन तासांनी म्हणजे पहाटे २ वाजता या विमानाने उड्डाण केले, जे सकाळी ६.४० वाजता पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर आधीच त्रासलेल्या प्रवाशांना त्यांचे सामान दुबई विमानतळावरच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. यादरम्यान, स्पाइसजेटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रवाशांनी प्रयत्न केले असता सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. ग्राउंड हँडलिंग आउटसोर्सच्या हवाल्यानुसार प्रवाशांना कोणतीही औपचारिक तक्रार पावती देण्यात आली नव्हती.
इंधनामुळे विमानाचा वाढला भार
विमानात इंधनाचा साठा वाढल्याने भार पेलण्याची विमानाची क्षमता संपली. त्यात पुन्हा सामानाचा भार नको म्हणून बॅगेज आणले नसल्याचे स्पाईसजेटने सांगितले आहे. दुबईहून पुण्यासाठी झेपावणाऱ्या विमानाची भार पेलण्याची क्षमता संपली. त्याची माहिती वैमानिकाला कॉकपिटमधील उपकरणातून मिळाली. त्यानंतर विमानतून प्रवाशाचे सामान न ठेवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली. परिणामी प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात दाखल झाले. सामान दुसऱ्या टप्प्याटप्याने दाखल होईल असे स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.