उरण : दिवसेंदिवस उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत असून प्रशासनाचे यावर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यातच उरण तालुक्यात अनेक ठिकाणी खुलेआम पणे सर्व्हिस रोडवर,सार्वजनिक ठिकाणी मद्यपी व्यसनी लोक बिनधास्तपणे ग्रुप करून दारू पीत असून मोठ्या प्रमाणात नशा सुद्धा करत आहेत. दारू पीत असताना तिथेच गांजा अफू चरसचे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सेवन करत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. उरण तालुक्यातील करळ फाटा हे अति महत्त्वाचे स्थान आहे.उरण मध्ये येण्यासाठी व उरण मधून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना या स्टॉप वरूनच पुढचा प्रवास करावा लागतो.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक करळ फाट्यावरून प्रवास करीत असतात.
गावातील महिला, शाळा कॉलेजमधील मुल-मुली,ज्येष्ठ नागरिक हे देखील इथूनच प्रवास करीत असतात मात्र करळ फाट्यावर जेएनपीटी प्रशासनाच्या सर्विस रोडलगत मदयपी दारुडे हे दारू,गांजा चरस अफू आदी नशेच्या पदार्थ्यांचे सेवन करत आहेत. त्यामुळे व्यसनी लोकांचा वापर येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मद्यपी व्यसनी लोकांची या परिसरात दादागिरी हुकुमशाही वाढली असून सदर मद्यपी व्यसनी व्यक्ती ग्रुप करून एकत्र बसून खुलेआमपणे दारू पीत गांजा ओढत रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे सोनारी, करळ व आजूबाजूच्या गावांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रस्त्यावरून घरी जाताना महिलावर्ग शाळा कॉलेजमधील मुलींना शरमेने मान खाली घालून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे दारू पिणारे व गांजा ओढणारे व्यसनी व्यक्ती शाळा कॉलेज मधील मुलींकडे,महिलांकडे वाईट नजरेने पाहत असल्याने महिलांना धोका निर्माण झाला आहे.
संध्याकाळी ६ वाजले की हे लोक रस्त्यावर सर्विस रोड जवळ बसतात व रात्री बारा एक वाजेपर्यंत हे लोक ग्रुप करून दारू पिण्यासाठी खुलेआमपणे बिनधास्त बसतात. त्यांना कोणाचेही भीती वाटत नाही. शासनाची ना कायद्याची कोणाची भीती त्यांना वाटत नाही. कोणाचाही वचक त्यांच्यावर राहिला नाही.त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस करळ फाटा येथे जेएनपीटीच्या सर्व्हिस रोड लगत दारू पिणाऱ्यांची व गांजा ओढणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला वेळीच आळा घातला गेले नाही तर चोरी विनयभंग, खून दरोडे बलात्कार यासारख्या घटनांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी खुलेआमपणे रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला दारू पिणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळ सोनारी व ग्रामस्थ तसेच महिला वर्गाच्या वतीने जेएनपीटी प्रशासनाकडे व न्हावा शेवा बंदर पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे. पत्रव्यवहार करून करळ फाटा येथील जेएनपीटीच्या सर्विस रोड लगत बसणाऱ्या मद्यपी व्यसनी लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.
एका व्यक्तीलाही तिथे बसून देण्यात येऊ नये अशी मागणी सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय म्हात्रे,उपाध्यक्ष प्रशांत कडू, माजी सरपंच पूनम कडू,माजी उपसरपंच ममता कडू, सोनारी महिला मंडळ अध्यक्ष रेश्मा कडू, किशोरी कडू, पंच कमिटी व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.यावेळी सर्व्हिस रोड वर महिलांनी मोर्चा काढला होता.आमचा कोणालाही विरोध नाही.आमचा रोजी रोटीला विरोध नाही. कामधंद्याला विरोध नाही. आमचा विरोध फक्त रस्त्यावर व रस्त्याच्या आजूबाजूला बसणाऱ्या मदयपी व गांजा चरस ओढणाऱ्या व्यक्तींना आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये.हा विषय गावाचा आहे. गावच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेतेचा विषय आहे. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अजय म्हात्रे यांनी केले असून सदर मद्यपीचा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी अजय म्हात्रे यांच्या सह ग्रामसुधारणा मंडळ, पंच कमिटी, महिला वर्ग तसेच ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासनाकडे व पोलीस प्रशासनाकडे केली आहे
काही दिवसापूर्वी द्रोणागिरी नोड मध्ये एका स्थानिक गावच्या रहिवाशी असलेल्या व्यक्तीवर परप्रांतीय व्यक्ति कडुन चाकू हल्ला झाला होता. तशाच प्रकार करळ फाट्यावर सर्विस रोड लागत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या चोरी दरोडे भांडणे,मारामारी,वाद-विवाद, विनयभंग खून, बलात्कार अशा घटना टाळण्यासाठी बेकादेशीर व अनधिकृतपणे जेएनपीटी च्या सर्व्हिस रोड लगत बसणाऱ्या सर्वच मद्यपी व व्यसनी व्यक्तीवर कायमस्वरूपी कारवाई व्हायला पाहिजे असे मत सोनारी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.