मुंबई : आजपासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याची तयारीत आहेत. काल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम झाला यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला.
हिंदी भाषा सक्तीवरून घेतलेला युटर्न, शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन, लाडकी बहीण तसेच विकासकामे यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून उघडकीस आलेले भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य याचा विरोधक समाचार घेणार आहेत. विविध मुद्यांवरुन पावसाळी अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाने आयोजित केलेला मोर्चा, शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाला दिलेली चालना, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने केलेले घुमजाव, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात सापडलेले कोट्यवधी रुपयांचे घबाड, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, पावसामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांची उडालेली दणादण आदी मुद्द्यांमुळे संख्येने अल्प असलेल्या विरोधी पक्षाशी सामना करताना महायुती सरकारला आज, सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन जड जाण्याची चिन्हे आहेत.