मुंबई : राज्य सरकारने हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरून घेतलेली माघार आणि त्रिभाषा सूत्रावरील शासकीय आदेश रद्द केल्यानंतर आता राजकीय पातळीवर मोठा बदल पाहायला मिळतो आहे. विरोधकांच्या दबावानंतर सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू केलेले त्रिभाषा सूत्र रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेला ५ जुलैचा मोर्चा आता रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी या निर्णयाचा विजय साजरा करण्यासाठी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांनी या बदलास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नसून मराठी माणसाच्या विजयाचे प्रतीक असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, "हा विजय खरंतर मराठी माणसाचा आहे. या मेळाव्याकडे पक्षीय दृष्टिकोनातून न पाहता मराठी अस्मितेच्या विजयाप्रमाणे पाहिले पाहिजे. संजय राऊतांनी काल मला फोन करून विचारले, 'यापुढे काय करायचं?' मी म्हटलं मोर्चा रद्द करावा लागेल. ते म्हणाले, 'आपण विजयी मेळावा घ्यायला पाहिजे.' मी सहमती दिली. आता सहकाऱ्यांशी चर्चा करून मेळाव्याचे ठिकाण निश्चित करू."
राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करत पुढील इशाराही दिला. "मराठी भाषेच्या विरोधात कोणी उभा राहिला तर माझा त्याला विरोध राहील. मराठी महाराष्ट्र या विषयावर कुठलीही तडजोड चालणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेवर वार करणाऱ्यांना रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मराठी माणसानेही जागृत राहून आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी," असे ते म्हणाले.
दरम्यान, त्रिभाषा धोरणावर नव्याने समिती स्थापन करण्यात येणार असून, तिच्या अहवालानुसार कितवीपासून हिंदी शिकवावी याचा निर्णय घेतला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाआधी शासनाने त्रिभाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यामुळे मराठी भाषेच्या समर्थकांमध्ये समाधानाची भावना पसरली आहे.