पुणे : विश्रामबागवाडा हे पुण्याचे वैभव असून 1750 साली बाजीराव पेशवे ( दुसरे ) यांनी हरी पंत भाऊ फडके यांच्याकडुन विकत घेतली व 1810 साली येथे भव्य विश्रामबागवाडा बांधला.1820 मध्ये पेशव्यांनी वाडा खाली केला व तेथे पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून वेद शाळा सुरु झाली , पुढे येथे डेक्कन कॉलेज सुरु करण्यात आले व 1880 मध्ये वाड्याचा पूर्वेकडचा भाग जळाला.1930 ते 1960 पुणे महानगरपालिका विश्रामबाग वाड्यात हलविल्याचे उल्लेख सापडतात.साधारण 1990 मध्ये वाड्याचे संवर्धन करून हा ऐतिहासिक वारसा जपण्यात आला.
असा सोनेरी ऐतिहासिक वारसा असलेल्या वाड्याचे विगत दोन वर्षे जतन व संवर्धानाचे ( Restoration ) काम पुणे मनपाच्या प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या हेरिटेज सेल च्या माध्यमातून सुरु असल्याचे संदीप खर्डेकर यांच्या निदर्शनास आले.हे काम पूर्ण होण्यास होणारा विलंब बघता याबाबत आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रशासनास कळविल्यानंतर युवराज देशमुख यांनी हेरिटेज सेल चे उप अभियंता आणि ह्या प्रकल्पावर काम करणारे सुनील मोहिते यांना माझ्याशी संपर्क करण्यास सांगितलं व त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणीसाठी जाऊयात असे सुचविले.
विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग हा ऊन वारा पावसामुळे क्षतीग्रस्त झाला होता, त्याला मूळ स्वरूपात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत व यांस यश आले असून येत्या जुलै अखेर वाड्याचा दर्शनी भाग पूर्णपणे नागरिकांसाठी खुला करण्यात येईल असे श्री. मोहिते यांनी वाड्याच्या भेटी दरम्यान स्पष्ट केले. प्राचीन काळातील अत्यन्त नाजूक कलाकुसर असलेली लाकडी महिरप व सज्जा त्याच स्वरूपात पुन्हा उभारण्याचे काम अवघड होते व त्यावर मेहनत घेतल्यामुळे त्याचे मूळ स्वरूपात संवर्धन करणे शक्य झाले व म्हणूनच ह्या कामाला वाजवीपेक्षा जास्त वेळ लागला असेही श्री.सुनील मोहिते यांनी स्पष्ट केले.
ह्या वाड्यातील दालन क्रमांक एक व दोन चे काम आधीच पूर्ण झाले आहे व ते आम्ही पर्यटकांसाठी खुले देखील केलं आहे मात्र मुख्य दर्शनी भाग आता जुलै अखेर सुरु केला जाईल असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.सध्या येथे एक पोस्ट ऑफिस व पुणे मनपा परिवहन महामंडळाचे पास केंद्र सुरु असून संपूर्ण वाडा हा अत्यन्त प्रेक्षणीय असा आहे.आता मनपा प्रशासन आपला शब्द पूर्ण करून जुलै अखेर वाडा नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी खुला करतील असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.तसेच हा "वाडा" अन्य वास्तूंप्रमाणे मनपा नेच चालवावा, राखावा किंवा पूर्वीप्रमाणे एखाद्या संस्थेस चालविण्यासाठी द्यावा याचा त्वरित निर्णय करावा व नागरिकांना हा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावा.