सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

“निर्णय मान्य नसेल तर निघून जा” – आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया जिव्हारी लागलेल्या नेत्याचा राजीनामा

अजिंक्य स्वामी    01-07-2025 10:27:27

कोल्हापूर : ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीला आता उघड स्वरूप येऊ लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहरप्रमुखपदी नियुक्त झालेल्या हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा व सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा राजीनामा हे केवळ चुकीच्या पदनियुक्तीमुळे झालेले दु:ख नसून, पक्ष नेते आदित्य ठाकरेंनी दिलेल्या उत्तराने सुर्वेंना अधिकच मनस्ताप झाल्याची कबुली त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात दिली आहे.

मुळात हर्षल सुर्वे हे जिल्हाप्रमुखपदासाठी इच्छुक होते, परंतु त्या ठिकाणी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या सुर्वेंनी आपल्या मनातील खंत पक्षश्रेष्ठींना बोलून दाखवली होती. मात्र, यावर आदित्य ठाकरे यांनी “निर्णय मान्य नसेल, तर निघून जा” अशी थेट प्रतिक्रिया दिली, असे सुर्वेंनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

“आजवर पक्षाचा प्रत्येक आदेश मान्य करून काम केले, कधीही आदेश झुगारला नाही. पण आता जेव्हा आदित्य साहेबांनी ‘निर्णय मान्य नसेल तर निघून जा’ असं स्पष्ट सांगितलं, तेव्हा मी त्यांच्या आदेशाचा मान ठेवून पद व पक्ष सोडत आहे”, असे सुर्वे यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.

हा राजीनामा सुर्वे यांनी कोल्हापूरचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तसेच शिवसेना सचिव विनायक राऊत आणि उपनेते संजय पवार यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून कळवला.या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला असून, स्थानिक पातळीवर नेतृत्व ठरवताना पक्षांतर्गत संवाद व समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या ‘निर्णय मान्य नसेल तर निघा’ या विधानाचे पडसाद स्थानिक पातळीवर कितपत उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती