पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राज्यात मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने करण्याची मागणी केल्यानंतर आता ब्राम्हण महासंघही या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने पुणे स्टेशन परिसरात “थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक” असे फलक झळकावले आहेत.
या बॅनरद्वारे केवळ नामांतराची मागणीच नव्हे, तर “पेशवा नावाला विरोध का?” याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते यावर गप्प का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
राजकीय संघर्षात ‘पोस्टर वॉर’; जिजाऊ आणि मस्तानीही चर्चेत :
ब्राह्मण महासंघाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे बॅनर लावले आहेत. पेशवा नावाला विरोध का? याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील या फलकांच्या माध्यमातून करण्यात आलीय आहे. खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधातील बॅनरवर सर्व पक्षीय नेते गप्प का? अशी विचारणा देखील आनंद दवे यांच्याकडून करण्यात आली आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा नावासाठी पाठपुरावा करण्याचा आणि त्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा ब्राम्हण महासंघकडून करण्यात आली आहे.
पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद
पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली होती. तर, पुणे शहरात 'पोस्टर वॉर' सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळाले. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले होते. या बॅनरमध्ये 'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!' असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आले होते.
पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी खासदार यांनी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची ही मागणी आहे.