पुणे : पुणे महापालिका हद्दीतील सिंहगड रस्त्यावर फन टाईम टॉकीज परिसरात पथविक्रेत्यांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक अतिक्रमण कारवाईच्या विरोधात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्हा शाखेच्या वतीने दि. ४ जुलै २०२५ रोजी महापालिके समोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, के.सी.पवार, राहुल उभे, कल्पना जावळे,विजय अठवाल, अंकल सोनवणे,एड.अमित दरेकर,नारायण भिसे,रणजित सोनावळे,अभिजीत पाटील,आलोक गिरणे,कुसुम दहिरे,श्रावण कांबळे,अब्दुल शेख, स्वाती देशमुख,राजू म्हसके,शोभा कुडाळकर,मयूर विटेकर, राम आल्हाट, बंडू वाघमारे, इत्यादी उपस्थित होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता व पथविक्रेता संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत विक्रेत्यांचा माल विनापत्र जप्त केला. यादीही दिली गेली नाही. नाशवंत माल तत्काळ परत द्यायचा नियम असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत विक्रेत्यांना न्याय नाकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीने आज ढोल ताशांच्या गजरात निषेध करत महापालिकेच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.यावेळी अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत, सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. पथविक्रेत्यांच्या हक्कांचे उल्लंघन थांबवावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आंदोलनात पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आणि पथविक्रेते सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून, लवकरात लवकर न्याय न दिल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.