पुणे : पुण्यातून संतापजनक वृत्त समोर आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून सुरज शुक्ला असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे मुंडके उडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. हातात कोयता घेऊन तो पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली.
शुक्ला याने स्थानक परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ जाऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात धारधार शस्त्र होते. मात्र, पुतळ्याची विटंबना करण्यापूर्वीच त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
सूरज शुक्ला हा मुळचा वाराणसी येथील आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील वाईत वास्तव्याला होता. त्यानंतर तो पुण्यात आला आहे.