मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. याबाबत दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आल्यानंतर देखील वाद थांबलेला नाही. महाराष्ट्रातील मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तसेच मराठी बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अमराठी राजकीय नेते गंभीर टीका करत आहेत. खास करुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अकेलेचे तारे तोडून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखावला होता. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या मराठी-हिंदी वादात उडी घेऊन राज ठाकरे आणि मराठी समाजाविरोधी वादग्रस्त वक्तव्य केले. तर, भाजप नेते आशीष शेलार यांनी काल (रविवार, ६ जुलै) महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्या व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीची तुलना थेट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी केली होती. या दोन्ही वक्तव्यांवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया 'X'वर पोस्ट करत भाजपवर जोरदार हल्ला चढवत ''महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?'' असा संतप्त सवाल केला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठी माणसांना दुखावऱ्या निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात. चांगले व्यवसाय करुन आनंदामध्ये राहत आहेत. मात्र हे जे कोणी फडतूस कॅरेक्टर हे जे भाजपेच खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे. आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. आणि फक्त येथे नाही तर संपूर्ण देशामध्ये भाजून घ्यायची आहे. म्हणून असे कॅरेक्टर बोलू लागतात,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हंटले, की ''भाजप दररोज महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे. भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली - ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.''
निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आदित्य ठाकरे म्हणाले की ''आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे. प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?'' असा प्रश्न त्यांनी केला.
फोडा आणि राज्य करा – भाजपची जुनी रणनीती
तसेच ते पुढे म्हणाले, की ''हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे - खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी! महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही - त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो. द्वेष, फूट आणि भांडणं!''
हे भाजपचे बाहुले..
मराठी आणि महाराष्ट्रविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, की ''पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या 'प्लेबूक' जाळ्यात अडकू. हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी.''
जर भाजपने कारवाई केली नाही, तर...
शेवटी आदित्य ठाकरे यांनी म्हंटले, की ''पण सावध राहा - हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!''
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्रित विजयी सभा देखील घेतली. यावरुन भाजप नेते टीका करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आमची लढाई ही सरकारच्या विरोधामध्ये होती. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात लढाई करत नव्हतो. आम्ही सक्तीच्या विरोधात लढत होतो. हिंदी सक्तीच्या विरोधात ही लढाई होती. निशिकांत दुबे हे उत्तर भारतीयांचे प्रतिक नाहीत. आमच्याकडे आनंद दुबे आहेत. जे शिवसेनेमध्ये चांगलं काम करत आहेत. निशिकांत दुबेंसारख्या लोकांना कोणतीही स्पेस दिली नाही तर यांचे हे राजकारण चालणार नाही,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.