सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

मनसेला मोर्चाची परवानगी का दिली नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

डिजिटल पुणे    08-07-2025 13:57:22

मुंबई :काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर येथे मराठी माणसाविरोधात काही स्थानिक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. याला उत्तर म्हणून आज मीरा-भाईंदर येथे मराठी माणसांचा मोर्चा निघणार असून, मोर्चा निघण्याच्या आधीच पोलिसांनी मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलीय.काही नेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्यात. आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव  यांना ताब्यात घेतलं. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.इतकेच नाहीतर मीरा भाईंदर येथे जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मनसे नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.  सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व प्रकरणावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, मोर्चा काढणारे नेते जाणूनबुजून जिथे संघर्ष होईल अशा मार्गावर मोर्चासाठी परवानगी मागत होते. त्यामुळे परवानगी नाकारल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा रुट मागत होते. पण पोलीस त्यांना नेहमीचा रुट घ्या, असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एका बाजूला मीरा-भाईंदर येथील मोर्चा तर दुसऱ्या बाजूला भाजपा खासदार निशिकांत दुबेंच्या बेताल वक्तव्याचे पडसाद आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटण्यास सुरुवात झाली असून, सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून, ते म्हणाले की, "मोर्च्यासाठी कोणीही परवानगी मागितली की आम्ही परवानगी देतो. नाकारत नाही. मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा होती, अशी माहिती मला मिळाली. मोर्चा काढणारे नेते जाणूनबुजून संघर्ष होईल अशा मार्गांची मागणी करीत होते. या संदर्भात त्यांच्याकडे माहिती आली की, काही व्यक्तींना या मोर्चात वेगळी कारवाई करायची आहे. नेहमीचा मार्ग घ्या, असं त्यांना पोलिसांनी सांगितलं. त्यास त्यांनी नकार दिला. म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

 पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मनसेच काय कोणालाही मोर्च्याची परवानगी हवी असेल तर परवानगी मिळेलच. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी परवानगी मिळेल हा गैरसमज आहे. योग्य मार्ग देऊन परवानगी हवी असेल तर ती देऊ. पोलिसांनी जो मार्ग दिला त्यावर जुना मोर्चा निघाला. यांनी जाणूनबुजून असा मार्ग मागितला जिथे मोर्चा निघणं कठीण आहे. त्यांना सभेसाठी परवानगी हवी होती ती काल आम्ही दिली. इतकी वर्ष मोर्चे काढले जात आहेत. 5 तारखेचा मोर्चा काढायचा, तेव्हा चर्चा करून मार्ग ठरवला होता. एखाद्या मोर्च्याने कायद्यामध्ये बिघाड होणार असल्यानं पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली होती," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 तर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निशिकांत दुबे यांचं म्हणणं ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात ते बोलले आहेत. असं बोलणं योग्य नाही. जे अर्थ निघतात त्यावर संभ्रम तयार होतात. या देशाच्या जडणघडणीत मराठी माणसाचं योगदान मोठं आहे. ज्या वेळी परकीय आक्रमकांनी भारत संपवण्याचं काम केलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढाई केली. पानिपतची लढाई देखील लढली गेली. मराठे तोही मुलुख वाचवायला पानिपतच्या लढाईत गेलेले. जीडीपीमध्ये जास्तीत सहभाग देणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या योगदानावर कोणीही प्रश्न उपस्थित करू नयेत," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.


 Give Feedback



 जाहिराती