सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चापूर्वी कारवाई ;मनसे नेते अविनाश जाधवांना पहाटे साडेतीन वाजताच पोलिसांनी घेतलं ताब्यात

डिजिटल पुणे    08-07-2025 14:06:12

मुंबई : मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता. अमाराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्च्याला उत्तर म्हणून मनसेकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अविनाश जाधव आणि मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मीरा भाईंदर आणि मुंबईमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून आज मनसेकडून शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. पण पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मनसे मोर्चावर ठाम होती, त्यामुळे मंगळवारी पहाटे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.

अविनाश जाधव यांच्यानंतर पोलिसांकडून मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वसई आणि विरारमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये आजच्या मोर्चावर अनिश्चततेचे सावट निर्माण झाले आहे. हा मोर्चा आज सकाळी  10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार असून, मिरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार आहे.

 पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा जाधवांचा आरोप

पोलिसांनी मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच, असा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबातही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आणली जात आहे. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. 

मनसेचा मोर्चा नेमका कशासाठी?

मीरा-भाईंदर शहरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. शहरात मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार देणे, तसेच विशिष्ट समाजाच्या नावाने शहरात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे मराठी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या सगळ्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती