सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

ही तर भाजपची आणीबाणी; संदीप देशपांडे यांचा आरोप

डिजिटल पुणे    08-07-2025 14:56:34

मुंबई : मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय हिंदी भाषिकांकडून काढण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या विरोधातील मोर्चाला उत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील मीरा भाईंदर मध्ये मराठी व्यापाऱ्यांचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मोर्चाच्या आधीच पोलिसांच्या वतीने मोर्चाला परवानगी नाकारत या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काल मध्य रात्रीपासूनच मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही भारतीय जनता पक्षाची दडपशाही असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

नुकताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणीबाणी विरोधी दिवस पाळण्यात आला. मग आता महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते. ही आणीबाणी नाही तर काय? महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळते. आणि मराठी माणसाला मिळत नाही? यावर त्यांनी आक्षेप घेतला. आता मनसेच्या नेत्यांना अटक केली असली तरी देखील सर्वसामान्य मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल आणि हा मोर्चा निघेलच असा दावा देखील देशपांडे केला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल. मात्र मीरा-भाईंदर परिसरामध्ये मोर्चा निघणार असल्याचे देखील संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितले. ही पोलिसांची दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजराती व्यापाऱ्यांना खुली सुट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचे, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा देखील देशपांडे यांनी दिला आहे.

ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे दुबे सारखे नेते, प्रक्षोभक विधान करत आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. मात्र, आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वादाला बळी पडणार नाही. हे सर्व शड्यंत्र सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करायचे षड्यंत्र भारतीय जनता पक्ष करत आहे. या षड्यंत्रात आम्ही बळी पडणार नाही. त्याचे नेते आताच का बोलले? आताच हे कुठून निर्माण झाले? हे जाणीवपूर्वक बिहार निवडणुकीमध्ये मध्ये याचा फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे गुजराती, उत्तर भारतीय, बिहारी लोकांचे मला फोन आले आहेत. त्यांचा याला पाठिंबा नसल्याचे त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. हे भारतीय जनता पक्षाचे षड्यंत्र आहे. त्यामुळे असे भडक वक्तव्य देऊन भाजप तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे वातावरण मराठी विरुद्ध अमराठी तयार व्हावे आणि त्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये उचलण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न चालू आहे. दुबे महाराष्ट्रात आहे का? कुठे बसलाय? बिहारमध्ये बसून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला. महाराष्ट्रात आम्हाला शांती हवी आहे. असे वाद पेटवण्याचा प्रयत्न जो करत असेल सरकारने त्यावर योग्य ती कारवाई करावी. कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. अशी धमकी आम्हाला दिली जात आहे, मग अशा लोकांवर महाराष्ट्र सरकारने कारवाई करायला हवी, अशी मागणी देखील देशपांडे यांनी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती