मुंबई : मीरारोड – परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिक संघटनांनी मीरारोडमध्ये जोरदार मोर्चा काढण्याचे ठरवले होते. या मोर्चामध्ये मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह अनेक मराठी संघटनांचा सहभाग होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत, मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना ताब्यात घेतले. अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या.
काल रात्रीपासून पोलिसांकडून मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज मिरा भाईंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल, मिरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम 144 लागू केल्याने संतप्त वातावरण पाहायला मिळाले होते. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाले. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळायला. या सगळ्यानंतर पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. मात्र, मोर्चाचा मार्गात थोडासा बदल झाल्याचे समजते. हा मोर्चा मार्गस्थ झाला तरी त्याला अजूनही पोलिसांची परवानगी मिळालेली नाही, असे समजते.
सकाळी १० वाजता कार्यकर्ते मोर्चा स्थळी जमू लागले आणि त्याच वेळी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई सुरू केली. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र या सगळ्या अडथळ्यांना न जुमानता मराठी जनतेने मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थिती लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी “जय मराठी”चा नारा देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तरी मोर्चाच्या प्रचंड जनसमुदायामुळे त्यांना थांबवणे अशक्य झाले. मोर्चेकरी डोक्यावर पांढऱ्या गांधी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन ठरलेल्या मार्गाने पुढे सरकत होते.
या वेळी मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले, “आम्हाला आमच्या मराठीपणाचा अभिमान आहे. पोलिसांनी अनेक नेत्यांना अटक केली, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, पण मराठी जनतेने एकत्र येत आपला आवाज उठवला. ही एकजूट आता कायम राहणार आहे.”मोर्चात सहभागी झालेल्या सर्व संघटनांनी एकमुखाने मराठी हितासाठी लढण्याचा निर्धार केला. मीरारोडमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे मराठी अस्मितेचा पुन्हा एकदा जागर झाल्याचे चित्र होते.
सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले आहेत. मनसेचे नेते अभिजित पानसेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आता शांतीनगर भागाच्या आसपास दाखल झाला आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर जैन आणि गुजराती लोकसंख्येचे प्रमाण जास्त झाला आहे. त्यामुळे शांतीनगरच्या वेशीवर स्वामी विवेकानंद रोडवर पोलिसांनी मोर्चा पुन्हा रोखला आहे. त्यामुळे मराठी आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आम्हाला पुढे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या मांडू, अशी भूमिका मराठी आंदोलकांनी घेतली आहे. मिरा रोड स्टेशन जवळील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकाजवळ मोर्चा समाप्त होईल, अशी माहिती मिळत आहे.
पोलिसांनी बालाजी हॉटेल चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता. याठिकाणी मराठी आंदोलक आल्यावर त्यांना पकडून गाडीत डांबले जात होते. मात्र, थोड्याथोड्यावेळाने कार्यकर्ते याठिकाणी येत होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यासाठी आलेल्या बेस्ट बसेस भरुन गेल्या. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना रिक्षातून पोलीस ठाण्यात आले. अखेर पोलीस ठाण्यात जागा न उरल्याने पोलिसांनी काही मराठी आंदोलकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवले होते.