पुणे : लहान मुलांना घरी एकटं सोडून पटकन जवळपास जाऊन येणाऱ्या पालकांची उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. मात्र नकळत्या वयातील मुलांनी कुतुहलातून उचलेली काही पावलं त्यांचा जीव धोक्यात घालणारी ठरु शकतात. याचं उदाहरण नुकतंच पुण्यात पाहायला मिळालं. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलच्या पोकळीतून बाहेर गेलेल्या चार वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले. यामुळे कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले जात आहेत.
पुण्यात चार वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. संबंधित चिमुकली तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडणार होती. मात्र अग्निशमन दलातील जवान योगेश अर्जुन चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.आज सकाळी ९ च्या सुमारास कात्रज येथील गुजर-निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये एक थरारक घटना घडली. याच बिल्डिंगमध्ये राहणारे अग्निशमन दलाचे जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला.
उमेश सुतार नावाच्या व्यक्तीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून अग्निशमन दलातील तांडेल योगेश चव्हाण धावत बाहेर आले. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले. त्यावेळी भाविका चांदणे नावाची चार वर्षांची मुलगी खिडकीत अडकली होती. घरात कोणीच नव्हते. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती.
घटनेची माहिती देताना योगेश चव्हाण म्हणाले, "मी माझ्या बिल्डिंगमधील उमेश सुतार नावाच्या व्यक्तीला ओरडताना पाहिले. त्यांचा आवाज ऐकून मी तात्काळ गॅलरीत आलो. पाहिले असता, सोनवणे बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून भाविका चांदणे (वय ४ वर्ष) नावाची मुलगी बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकलेली दिसली." "मी पाहिल्यानंतर सोनवणे बिल्डिंगकडे धाव घेतली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो," असे योगेश यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, "आईकडून दरवाजा पटापट उघडून त्या मुलीला बेडरुमच्या खिडकीतून घरात खेचून घेतले आणि तिचा जीव वाचवला.
क्षणाचाही विलंब न लावता चव्हाण यांनी सोनवणे बिल्डिंगच्या दिशेने धाव घेतली आणि थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि मुलगी घरात एकटीच होती. सुदैवाने, त्याच वेळी मुलीची आई तिच्या दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून घरी परत येत होती. चव्हाण यांनी तात्काळ आईकडून दरवाजा उघडायला लावला आणि बेडरूमच्या खिडकीतून त्या चिमुकलीला सुखरूप घरात खेचून घेतले. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे एक मोठा अनर्थ टळला आणि चिमुकलीचे प्राण वाचले.." योगेश चव्हाण हे तांडेल (अग्निशमन दल, पुणे) आहेत. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे एका लहानगीचा जीव वाचला. मात्र पालकांनी आपल्या लेकरांच्या बाबतीत हलगर्जी बाळगू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.