सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 राज्य

गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; 9 जणांचा मृत्यू

डिजिटल पुणे    09-07-2025 14:50:14

गुजरात : गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे आनंद आणि बडोदा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल आज (बुधवार) सकाळी अचानक कोसळला. पुलाची दोन तुकडे झाले. पूल कोसळल्याने त्यावरुन जाणारी अनेक वाहने थेट नदीत कोसळली.अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन पथके पाठवण्यात आली आहेत. 45 वर्षे जुना हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडतो. पूल कोसळल्यामुळे दक्षिण गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, तापी आणि वलसाड यासारख्या शहरांमधून सौराष्ट्रला पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागेल. आता यासाठी अहमदाबादमार्गे लांब मार्गाने जावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. आनंद आणि बडोदा मार्गावरील महिसागर नदीवर असलेला हा गंभीरा पूल कोसळला. पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असतानाच पुलाचे दोन तुकडे झाली. परिणामी, अनेक वाहने नदीत कोसळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह एकूण चार वाहने नदीत कोसळली आहे. आतापर्यंत 9 मृतदेह हाती लागले आहेत.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. एका स्थानिक तरुणाने सांगितले की, "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही." स्थानिकांनी सांगितले की, पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. 6 जणांना वडोदरा येथील पद्रा रुग्णालयात आणि 2 जणांना सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली. त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. 

लोकांनी सांगितले की, 45 वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेकवेळा कळविण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांच्या पथकाला चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा जुन्या आणि कमकुवत पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर वेळेत वाहनांची वाहतूक थांबवली असती आणि नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले असते, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती. आता तपास अहवालात काय बाहेर येते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहावे लागेल.

या दुर्घटनेमुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली असून, मदतकार्याला गती देण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप नदीत नेमकी किती वाहने पडली आहेत आणि किती लोक बेपत्ता आहेत, याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती