सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

वाकड ते किवळे सेवा रस्त्याला कोणीच उरला नाही वाली!

अजिंक्य स्वामी    14-07-2025 11:04:23

पुणे  : पुणे महानगर आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड, किवळे, ताथवडे आणि हिंजवडी या भागाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलला आहे.आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, नवीन वसाहती आणि व्यावसायिक संकुले यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. लाखो आयटी कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी, तसेच कामगार वर्ग दररोज या भागातून प्रवास करतात.

परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यावरदेखील या भागातील मूलभूत पायाभूत सुविधांची कामे अर्धवटच राहिल्याचे चित्र आहे. त्यामध्ये वाकड ते किवळे हा सेवा रस्ता (Service Road) हा सर्वात मोठा प्रलंबित प्रश्न ठरतोय.हा रस्ता अपूर्ण असल्यामुळे रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, इंधनाचा व वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या मुद्द्याने नागरिकांच्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होत असून, प्रशासनाकडून या कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

वाकड ते किवळे सेवा रस्त्याच्या मुख्य समस्या खालीलप्रमाणे आहेत:

१. अर्धा तास पाऊस – दोन फूट पाणी

पावसाळा सुरु झाला की, या रस्त्याचा अक्षरशः श्मशान बनतो. केवळ अर्धा तास जोरदार पाऊस झाला, तरी रस्त्यावर २ ते ३ फूट पाणी साचते. वाहने बंद पडतात, लोकं रस्त्यावरून चालू शकत नाहीत आणि पावसाच्या पाण्यातून चालणं हे जीवावर बेततं.गटारांची क्षमता आणि निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे अपुरी आणि ढासळलेली आहे. नागरिक अनेकदा या समस्येचा सोशल मीडियावर आवाज उठवत असले तरीही प्रशासनाने त्याकडे केवळ पाहणीपुरतं लक्ष दिलं आहे.

२. वाहतूक कोंडी – दररोजचा त्रास

सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत सेवा रस्त्यावरून प्रवास म्हणजे नरकयात्रा. चाकरमानी, विद्यार्थी, रिक्षा, स्कूल व्हॅन, खाजगी वाहनं, बस—सर्व एकाच रस्त्यावर.रस्त्याची रुंदी कमी, अतिक्रमण आणि वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळे तासन्तास कोंडी होते. अपघातही वारंवार घडतात.ही केवळ वाहतूक यंत्रणेची अकार्यक्षमता नाही, तर प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचं उदाहरण आहे.

३. PMRDA कडून हिंजवडीत काम सुरू, पण NHAI चं दुर्लक्ष

हिंजवडी फेज १, २, ३ मधील मुख्य रस्त्यांवर PMRDA कडून वाहतूक आणि पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही प्रमाणात काम सुरु आहे. परंतु वाकड-किवळे सेवा रस्ता हा NHAI च्या अखत्यारित येतो, आणि तिथे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

४. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

गेल्या काही वर्षांत अनेक स्थानिक आमदार, खासदार, पक्षाचे नेते यांनी या प्रश्नावर बैठक घेतल्या, निवेदने केली. पण हा सगळा केवळ औपचारिकता आणि प्रसारमाध्यमांपुरता राहिला आहे. सत्ताधारी नुसते येऊन नेत्यांबरोबर फोटोसेशन करून निघून जातात, पण रस्ता मात्र अद्याप तसाच आहे.नेत्यांच्या शिफारशी या केवळ राजकीय स्टंट बनला आहे, लोकांच्या समस्यांवर त्यांचा गंभीर दृष्टिकोन दिसत नाही.

५. बस थांब्यांचा अभाव – जीव मुठीत धरून प्रवास

या सेवा रस्त्यावर एस. टी., पीएमपीएमएल किंवा खाजगी बस थांब्यांची कोणतीही ठोस सुविधा नाही. भर पावसात, उन्हात प्रवाश्यांना महामार्गाच्या बाजूला उभं राहावं लागतं.यामुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढते. अनेक महिला, वृद्ध आणि लहान मुले अस्वस्थ आणि असुरक्षित वाटतात.

६. काम अडलंय कुठे?

या सेवा रस्त्याचं काम “दूरगामी नियोजन, निधी मंजुरी, सिमेंटेड स्ट्रक्चर डिझाईन, भूमी अधिग्रहण” अशा अनेक पातळ्यांवर अडकलेलं आहे. परंतु आजवर या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता नाही. कोणताही ठोस आराखडा अजून प्रसिद्ध नाही.

सेवा रस्त्याऐवजी ‘सेवा बंद’ रस्ता!

वाकड ते किवळे सेवा रस्त्याचं काम हे एक “प्रशासकीय उदासीनता + राजकीय फसवणूक + निधी अभाव” याचं ठळक उदाहरण आहे. ही समस्या केवळ एका रस्त्याची नाही, तर संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरातील पायाभूत सुविधांतील अपयश अधोरेखित करणारी आहे. वाकड ते किवळे हा “सेवा रस्ता” कधी पूर्ण होईल याकडे सर्वांची नजर आहे. अन्यथा हा रस्ता “सेवा रस्ता” न राहता कायमचा “सेवा बंद रस्ता” म्हणून ओळखला जाईल, ही खंत नागरिकांच्या मनात अधिक खोलवर रुजत चालली आहे.


 Give Feedback



 जाहिराती