पुणे : पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असताना पोलीस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तळजाई टेकडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही पैलवानांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एका विद्यार्थिनींनी सांगितले की , सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडीवर वर्कआउट करण्यासाठी आले होते. सर्व विद्यार्थी हे पुणे फिटनेस क्लब या अकॅडमी चे विद्यार्थी आहेत. मुजीब पठाण हे या अकॅडमीचे संचालक आहेत.
तळजाई टेकडी परिसरात दररोज अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करत असतात. सोमवार सकाळीही नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सराव करत होते. त्यावेळी अचानक दहा ते बारा जणांचा एक टोळकी तिथं आली आणि त्यांनी सराव करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अडवत मारहाण केली. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचाही समावेश होता. काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत टोळक्याने अपमानास्पद भाषेत धमकावले.
विद्यार्थिनीने सांगितले की, सकाळी नेहमीप्रमाणे वर्कआउट करण्यासाठी आलो असता अचानक काही पहिलवान आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. तसेच मुलींकडे बघून शिवीगाळ केली आज त्यांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच, अकॅडमीचे संचालक मुजीब पठाण यांनाही पैलवानांनी मारहाण केली. मात्र त्यांनी तसे का केले याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, हे पहिलवान हनुमान आखाडा आणि मामासाहेब मोहोळ आखाड्यातील असल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला. तसेच मारहाण करताना आमच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल आवारे आणि विजय चौधरी यांचा हात असून तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देखील या पैलवानांनी दिल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देणार असल्याचे विद्यार्थिनींने सांगितले.
हल्लेखोर गावगुंड कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुला-मुलींसोबत अशा प्रकारे मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली असून, संबंधित गुंडांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.